२०२५ वर्ष सुरू झाल्यापासून अनेक नव्या मराठी सिनेमांची घोषणा झाली आहे. तर काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यात दिवसागणिक वाढ होत असून आता ‘देवमाणूस’ या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झाली आहे. हा मल्टीस्टारर सिनेमा असून यात महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार झळकणार आहेत.

‘देवमाणूस’ चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांच्या निर्मितीसंस्थेने केली आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांची लव फिल्म्स कंपनी अनेक लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांसाठी ओळखली जाते, त्यांनी ‘तू झूठी मैं मक्कार’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ही कंपनी मराठी सिनेमात प्रवेश करत आहे. ‘देवमाणूस’ हा त्यांची निर्मिती असलेला पहिला मराठी सिनेमा असून, तो २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाबाबत नुकतीच महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.

हे गाणं एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसह काम करणं एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”