Santosh Juvekar Talk’s About Trolling : संतोष जुवेकर हा मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी मालिका, चित्रपट तसेच हिंदीतही अभिनेत्यानं काम केलं आहे. अलीकडेच तो ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. परंतु, त्याचदरम्यान, अभिनेता प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाला होत होता. अशातच नुकतंच त्यानं याबाबत सांगितलं आहे.

संतोष जुवेकरनं लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात रायाजी हे पात्र साकारलं होतं. त्यातील त्याच्या कामासाठी प्रेक्षकांकडून त्याचं कौतुक झालं. त्यानं नेहमीप्रमाणे त्याच्या अभिनयशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. परंतु, त्याचदरम्यान अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरा जात होता. त्यानं अभिनेता विकी कौशलबरोबरचा एक किस्सा त्यावेळी शेअर केला होता, ज्यामुळेसुद्धा अभिनेत्याला ट्रोल करण्यात आलेलं.

संतोष जुवेकरची ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया

संतोषनं आता ‘सकाळ’ला मुलाखत दिली असून, त्यामध्ये त्यानं ट्रोलिंगविषयी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. मुलाखतीत संतोषला “मराठी कलाकारांना मराठी ट्रोलर अनेकदा ट्रोल करत असतात. अनुभवी व अनेक मोठ्या कलाकारांबद्दलही खूप वाईट बोललं जातं याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया” आहे, असं विचारण्यात आलेलं. संतोष उत्तर देत म्हणाला, “ट्रोलिंगमुळे त्रास होत नाही वगैरे असं कितीही म्हटलं तरी असं काही नसतं वाईट तर वाटतंच.”

संतोष पुढे म्हणाला, “कितीही मोठा माणूस असला आणि तो कितीही मोठ्या मनाचा असला तरी त्याला जर कोणी कोही बोललं, तर त्यालाही वाईट वाटतंच. काही वेळा आपल्याला माहीत असतं की, समोरची व्यक्ती आपल्यावर का रागावली आहे वगैरे काही गोष्टींमुळे कदाचित ते रागावले असावेत, असं आपल्याला निदान कारण माहीत तरी असतं. पण जेव्हा कारणच माहीत नसताना लोक आपल्याला ट्रोल करतात. आपली निंदा करतात आणि ते हे सगळं का करत आहेत याच्यामागचं जर मला कारणच माहीत नसेल, तर मी त्यात का अडकू.”

अभिनेता ट्रोलिंगबद्दल पुढे म्हणाला, “त्यांना ट्रोल करायचं आहे, तर करू देत ते त्यांचं काम करत आहेत. मी माझं काम करतोय आणि जसं मी म्हटलं कधी कधी गालगुच्चा धरताना चिमटा लागतोच ना, शाबासकीची थाप देताना रट्टा लागल्यासारखं होतंच की, त्यामुळे ठिके काही हरकत नाही. मला वाटतंय आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं.”