Saurabh Gokhale On Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’चे अनेक कलाकारांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. आता मराठमोळा अभिनेता सौरभ गोखलेनेदेखील त्यावर वक्तव्य केले आहे. त्याने एका मुलाखतीत ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे.

सौरभ गोखलेने नुकताच ‘सकाळ प्रीमियर’शी संवाद साधला. या मुलाखतीत तो ‘ऑपरेशन सिंदूर‘बाबत म्हणाला, “आता नजीकच्या काळात कुठल्या देशाची भारताकडे वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होईल, असे मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं दोन महिला अधिकाऱ्यांनी मीडियासमोर भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांना सलाम आहे”.

“सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचं जेव्हा अनुवाद केला. तेव्हा त्यात लिहिलं होतं की, जेव्हा आपल्या देशातील तरुणी रस्त्यावर बूट वाजवत चालतील, तेव्हा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. ते आता आपल्याला होताना दिसत आहे. आता जेव्हा महिला सैन्याचं प्रतिनिधित्व करीत आहेत, देशानं घेतलेला निर्णय त्या सांगतात, तेव्हा देशाची ताकद कळते. तेव्हा लोकसुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहताना दिसतात”.

ऑपरेशन सिंदूर…

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांनी त्यांचे जीव गमावले होते. त्यानंतर संपूर्ण भारतातून संताप व्यक्त केला जात होता.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले होते. भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या काही तळांवर भारताने हल्ले केले. एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत हा एअर स्ट्राईक केला गेला आहे. या लष्करी कारवाईचे नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असे होते. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाला आहे.

सौरभ गोखलेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो ‘अरुंधती’, ‘मांडला दोन घडींचा डाव’, ‘राधा ही बावरी’ अशा मालिकांमध्ये दिसला आहे. अभिनेत्याचे राधा ही बावरी या मालिकेला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले. त्याबरोबरच ‘योद्धा’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’, ‘ तलाव’, ‘शिनमा’, ‘सर्कस’ अशा अनेक चित्रपटांत तो अभिनय करताना दिसला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सौरभ गोखले लवकरच ‘म्हणजे वाघाचे पंजे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात निखिल चव्हाण, तमन्ना बांदेकर, संजय नार्वेकर, दीपाली सय्यद, चिन्मय उदगीरकर, प्राजक्ता हनमघर, अनिल नगरकर व सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकात दिसणार आहेत.