Sayaji Shinde Mother’s Emotional Letter : मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. त्यांच्या नायक आणि खलनायक, अशा दोन्ही भूमिकांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे सयाजी त्यांच्या सामाजिक कामासाठीही तितकेच ओळखले जातात. राज्यभरात त्यांनी लाखो झाडं लावण्याचं काम केलं आहे, याबद्दल त्यांना ‘ट्रीमॅन’ म्हणूनही ओळखलं जातं.

अशा या ‘ट्रीमॅन’ म्हणजेच सयाजी शिंदे यांनी त्यांच्या नुकताच वयाचा ६६वा वाढदिवस साजरा केला. सयाजी शिंदेंचा ६६वा वाढदिवस पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्तच्या एका कार्यक्रमात सयाजी शिंदेंसाठी आईचं भावनिक पत्र वाचण्यात आलं. मराठी अभिनेता सागर कारंडेने या पत्राचं वाचन केलं असून लेखक अरविंद जगताप यांनी हे पत्र लिहिलं आहे.

अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय, “प्रिय सयाजी, ओळखलं? सैजा म्हटलं असतं तर लगेच ओळखलं असतं. हे पत्रात लिहावं लागतं म्हणून नाही, तर कुठल्या आईला लेकासाठी प्रिय लिहायची गरज पडली का? लेक प्रियच असतो. तुझा सहासष्टावा वाढदिवस. तू कॉलेजमध्ये असल्यापासून तुला आशीर्वाद देतेय, लय म्हातारा हो… पण तू अजून थोडाबी म्हातारा झाला नाहीस. बरं आहे, हळूहळू म्हातारा हो. मला अजून आठवतंय, मी तुझे सिनेमे बघायचे त्यात तू व्हिलन असायचा. मारामारी कर, लोकांना शिव्या दे, गळे दाब, गळे काप… व्हिलनचं ते कामच असतं म्हणे. पण, माझ्यासाठी तू हिरोच होतास आणि आहेस… मी तुला कधी सांगितलं नाही, पण इतक्या मोठ्या पडद्यावर हिरो हिरोईन आणि बाकीचे कलाकार असूनही मी तुलाच बघत बसायचे. आपलं लेकरू सोडून आईला दुसरं काय दिसतं म्हणा…”

यानंतर पत्रात असं लिहिलंय, “एका पिक्चरमध्ये हिरोने तुझी कॉलर धरली होती, तेव्हा टॉकीजमध्ये अशा शिव्या दिल्या होत्या… हिरो असला म्हणून काय झालं, माझ्या लेकराची कॉलर पकडतो? माझ्या शेजारची बाई म्हणली, सिनेमात हिरोच जिंकत असतो. तेव्हा मी म्हटलं, मग जगात व्हिलन कसे जिंकतात? मग पिक्चरमध्येच कशाला सगळीकडेच हिरो जिंकताना दाखवा, पण सिनेमात जे नाही तेच दाखवतात. काय बी असू दे… पण असू दे. नवीन नवीन असताना तू एका सिनेमात बाईच्या अंगावर हात टाकला होतास, तेव्हा किती बोलले होते. कळतच नव्हतं ते नाटक असतं. मी सारखी हे करू नको ते करू नको असं सांगत असायचे, पण तू शेकडो पिक्चर केले आणि एक काम भारी केलं ते सांगायचं राहिलं. आईचा जीव, सगळंच भारी वाटतं. तुझ्यामुळे टॉकीजमधले लोक हसले की बरं वाटायचं. आपल्यामुळे माणसाच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, ते पुण्याचं काम आहे.

यानंतर सागर कारंडे पत्र वाचताना म्हणतो, “सयाजी शिक्षणासाठी तुला मावशीच्या गावी ठेवलं. लोक म्हणायचे, लेकराला कशाला इतक्या लांब ठेवता? पण, पिल्लांनी झेप घ्यावी असं वाटत असेल तर त्यांना जास्त दिवस पंखाखाली ठेवून चालत नाही. तू जे झेप घेतलीस, गावच्या जत्रेत नाटकांत काम करायचा, डोंगरात मोठमोठ्याने नाटकातलं काहीतरी बोलायचा.. लोक म्हणायचे, नाटकाच्या नादामुळे पोरगा वाया जाईल. तेव्हा भ्या (भीती) वाटायची. पण एक मन म्हणायचं, मुगुटरावाचा पोरगा आहे, असं कसं वाया जाईल… तुझा बाप शेतात पाखरांसाठी कणीस टाकायचा. पाखरांच्या पोटासाठी काळजी करणाऱ्या बापाच्या पोरांचं कसं काय वाईट होईल. बापाच्या पुण्याईचं गाठुडं सोडून तू घरातून काहीच नेलं नाहीस.. कधी पोलिस, कधी पुढारी, एक भूमिका झाली की दुसरी… पण, तुझ्यात तुझा बाप मात्र कायमच दिसत राहिला.”

यापुढे पत्रात असं लिहिलं आहे, “मी शिक्षणासाठी तुला दुसऱ्या गावात नेलं, पण तू मला सगळ्या जगात नेलंस. तू तेलुगूमध्ये काम केलंस, तेव्हा तुला ते कसं कळणार म्हणून कोणी फसवलं तर असं वाटायचं. पण, त्या लोकांनी तुला मराठीपेक्षा चांगलं काम दिलं आणि देव बनवलं. लोक पाया पडत होते, तेव्हा साक्षात तुकाराम महाराज माझ्या पोटाला जन्माला आलेत असं वाटायचं. मी मनात येईल ते बोलायचे, पण काही म्हणायचा नाहीस, भेटायला आल्यावर लहान लेकरासारखे माझे गाल ओढायचास… सयाजी, लोकांना एक गोष्ट अजून कळलेली नाही… लेकरू झालं म्हणजे बाई आई होत नाही, तर लहानपणी ती लेकराचे जेवढे लाड करते, तेवढेच लाड तिच्या मोठेपणी लेकराने केले तर ती आई होते. आपल्या आईला लहान बाळाप्रमाणे माया करणारा मुलगा सगळ्यांना भेटूदे.”

यानंतर सयाजी शिंदेंची आई पत्रात असं म्हणतात, “लोकांसाठी तू अॅक्टर, पण माझ्यासाठी डॉक्टर… तुला बघितलं की दुखणं गायब व्हायचं. पण, देवभी लई खोडीचा… पैसा जन्मभर जपून ठेवण्यासाठी बँक असतात. पण, आई-बाप जपून ठेवण्यासाठी बँक नाय, एक दिवस गेले तुला सोडून. मला वाटलं आता तुझ्या सिनेमातला माझा रोल संपला, पण नाही.. एकदा तू माझी बीज तुला केलीस. त्या बिया सगळ्या राज्यात वाटल्यास. तुझ्यामुळे मी माऊली झाले, तुझ्यामुळे सावली झाले. झाड दिसलं की सयाजी त्याला मिठी मारून का उभा राहतो हे लोकांना अजून माहीत नाही. चाळीस देवराया उभ्या केल्यास, दहा लाख झाडं लावलीस. रायगड-राजगड बघून जिजाऊंना जसा शिवरायांचा अभिमान वाटत असेल ना तसा महाराष्ट्रात देवराई बघून मला माझ्या सयाजीचा अभिमान वाटतो.”

पुढे पत्रात असं म्हटलंय, “त्या फक्त देवरायाच नाही; किल्लेच आहेत. माझे गड-किल्ले… कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं ना, तर त्यांना अभिमानाने सांगेन की, महाराज माझ्यापोटी तुमचा मावळा जन्मलाय, त्याचं नाव सयाजी. त्याला खूप मोठा आशीर्वाद द्या. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणार नाहीत, पण त्यांचा महाराजांचा मावळा तर होईलच ना… असाच मावळा राहा आणि जेव्हा होशील तेव्हा खूप म्हातारा हो… तुझीच आई…”