Sayaji Shinde Lovestory : सयाजी शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. सयाजी शिंदेंनी त्यांच्या अभिनयशैलीने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते आहेत. पण, तुम्हाला माहीत आहेत का? त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांच्या खूप मोठ्या चाहत्या होत्या आणि आजही त्या त्यांच्या चित्रपटांबद्दल त्यांना अभिप्राय कळवत असतात असं त्यांनी सांगितलं आहे.

सायजी शिंदे यांच्या पत्नी अलका शिंदे यांनी नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आहे. सयाजी शिंदे व त्यांची भेट कशी झाली, त्यांचं लग्न कसं जुळलं या सगळ्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

‘अशी’ झालेली पहिली भेट

मुलाखतीत त्या त्यांचे पती सयाजी शिंदे यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल म्हणाल्या, “माझ्या बहिणीचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते आणि मी तिकडे त्यांना पाहायला गेले होते तेव्हा मला कळलं की, तिथे सयाजी सर आहेत. मी त्यांची फॅन होते, कारण त्यांचं रंगभूमीवरील काम मी पाहिलं होतं. ‘शोभायात्रा’ हे त्यांचं नाटक त्यावेळी सुरू होतं; तर मी तिथे त्यांना जाऊन भेटले, त्यांच्याकडून ऑटोग्राफ घेतला.”

सयाजी शिंदेंबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल त्या पुढे म्हणाल्या, “त्यावेळी त्यांना जॉन्डिस झाला होता. त्यांनी त्यावेळी मला काय वाचतेस वगैरे विचारलं होतं. मी सांगितलं की अमुक अमुक पुस्तक वाचत आहे वगैरे. तेव्हा मी एमए करत होते. ते म्हणाले, मला पुस्तकं देशील का वाचायला? मी मनात म्हटलं, वाह चांगली गोष्ट आहे, इतका मोठा माणूस आपल्याकडे काहीतरी मागतोय. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना पुस्तक नेऊन दिलं. त्यानंतर मी घरी येऊन या सगळ्याबद्दल सांगितलं.”

अलका पुढे म्हणाल्या, “मी त्यानंतर सगळं विसरून गेले, पण दोन-तीन महिन्यांनी मला त्यांचा फोन आला की, अगं तू हे पुस्तक दिलेलंस, तुला परत हवंय की नको? मग त्यानिमित्ताने आम्ही खरंतर भेटलो आणि मग तेव्हा मैत्री झाली. त्यानंतर २-३ वर्षं आम्ही एकमेकांना ओळखत होतो, नंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

अलका यांना पुढे मुलाखतीत अभिनय क्षेत्रातील कारकीर्द थोडीशी अस्थिर मानली जाते, त्यामुळे जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती; असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “माझी सगळी भावंडं माझ्यापेक्षा मोठी आहेत. माझी आणि सयाजी आमची भेट झाली त्या दरम्यान माझे वडील वारले. तेव्हा माझा मोठा भाऊ होता, ज्याला फक्त एका गोष्टीबद्दल अडचण होती की, आमच्या दोघांमध्ये १५ वर्षांचं अंतर होतं, त्यामुळे त्याने फक्त म्हटलेलं की, तू कसं जुळवून घेशील? कारण असं म्हटलं जातं की इतक्या वयाचं अंतर असून नये, पण आमची त्यासाठी तयारी होती. मग सयाजींना भेटल्यानंतर त्यांनी सहमती दिली, कारण सयाजींनी सगळ्यांना आपलंसं करून घेतलं.”