Senior actor Ashok Saraf on comedy: ‘अशी ही बनवाबनवी’, ‘एक शेर दुसरी सव्वाशेर’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, अशा अनेक चित्रपटांतून अभिनेते अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.
अफलातून अभिनय, खळखळून हसवणारे तसेच रडवणारी त्यांची पात्रे यामुळे त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्या अनेक भूमिकांचे आजही कौतुक होताना दिसते. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामाचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
“विसंगतीवर केलेला विनोद असेल…”
अशोक सराफ यांनी नुकतीच ‘अमुक तमुक’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मी कॉमेडियन नाही असे वक्तव्य केले. ते नेमकं काय म्हणालेत हे जाणून घेऊ.
या मुलाखतीत अशोक सराफ यांना विचारण्यात आले की, तुमच्यासाठी कॉमेडी म्हणजे काय? त्यावर अभिनेते म्हणाले, “त्याची व्याख्या करणं कठीण आहे. दुसऱ्याच्या दु:खावर बोट ठेऊन केलेल्या विनोदाला मी विनोद मानत नाही. दुसऱ्याच्या विचित्र वागण्यावरून केलेल्या विनोदाला किंवा बोलता बोलता झालेला विनोद, शाब्दिक विनोदालादेखील मी विनोद मानत नाही. विसंगतीवर केलेला विनोद असेल, तोच विनोद होऊ शकतो. विनोद ओढूनताणून न करता सहज झाला असेल तर तो लोकांना भावतो. मुळात विनोद करणं हे खूप कठीण आहे. विनोद लिहिण्यासाठी खूप विचार करावा लागतं. त्यानंतर तो तुम्ही कसा मांडता हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यातील विसंगती तुम्हाला शोधता आली पाहिजे.”
“लोक मला कॉमेडियन म्हणतात. पण…”
तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भूमिका जास्त आवडल्या? त्यावर अशोक सराफ म्हणाले, “मी कॉमेडी केली, लोकांना आवडली. लोकांना जे आवडलं, ते त्यांना देण, तशा भूमिका करणं मला भाग पडलं, त्यामुळे माझ्या अधिकतर भूमिका तशा आहेत, त्यामुळे लोक मला कॉमेडियन म्हणतात. पण, मी कॉमेडियन नाही. मी कॅरेक्टर आर्टिस्ट आहे.
पुढे ते म्हणाले, “विनोद किंवा कॉमेडी मी करतो, कारण तो अभिनयाचा एक भाग आहे; तो यशस्वी झाला ही गोष्ट वेगळी आहे. मी असाच लोकांसमोर उभा राहिलो तर मी कॉमेडियन दिसणार नाही. मी खलनायक दिसेन. मला कॉमेडी करावी लागते. मी बऱ्याच वेगळ्या गोष्टी करण्याचादेखील प्रयत्न केला. वेगळ्या भूमिका साकारण्याचादेखील प्रयत्न केला.”
“१९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘अरे संसार संसार’ चित्रपटात मी सावकाराची भूमिका साकारली होती. कॉमेडीला सोडून मी एक वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला होता. ती भूमिका साकरताना दमा लागल्यासारखं बोलणं, नजर यावर ती भूमिका साकारली होती. हा वेगळापणा होता. त्या भूमिकेला अनुसरून तेच करू शकत होतो. तसं कॉमेडी करताना कुठलीही फालतू अॅक्शन करता कामा नये. हाताची, तोंडाची, बोटांची कुठलीही फालतू अॅक्शन होता कामा नये, जी लोकांना हसायला प्रवृत्त करेल, त्यामुळे तुम्ही मुळात काय केलं आहे हे ते विसरून जातील. हाता-पायावर किंवा डबल मिनिंग असलेल्या विनोदावर कोणीही हसेल. पण, विसंगतीवर हसवणं कठीण आहे. पण, तुम्ही जेव्हा ती शोधून काढता, तेव्हा लोकांना मनापासून हसायला येतं. तुम्ही जर विनोद शरीरावर आधारित केला तर लोक पटकन विसरतील.”
दरम्यान, सध्या अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवर अशोक मा. मा. या मालिकेत काम करताना दिसत आहेत. त्यांच्या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.