Jayant Wadkar shares experience of working with Sachin Pilgaonkar: जयंत वाडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांत भूमिका साकारत त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांना वाड्या, असेही अनेक जण म्हणतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर, अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
“त्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये…”
जयंत वाडकर यांनी नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्याबद्दल वक्तव्य केले. जयंत वाडकर म्हणाले, “सचिन सर उत्तम माणूस आहेत. ‘आयत्या घरात घरोबा’मध्ये मी त्यांच्याबरोबर पहिलं काम केलं. ‘आमच्यासारखे आम्हीच’मध्ये होतो; पण सिनेमातला तो ट्रॅक कट झाला. त्यानंतर ‘नवरा माझा नवसाचा’मध्ये काम केलं. तो सिनेमा आजही हिट आहे. त्याचा दुसरा भागही चांगला चालला. ते खूप उत्साही आणि सकारात्मक आहेत.
“शूटिंगदरम्यान ९ च्या शिफ्टला नाश्ता नसतो, जो कुठेच नसतो; पण ते मागवतात. मी त्यांना विचारलेले की, तुम्ही का मागवता? ते मला म्हणालेले की, टेक्निशियन्स असतात, इतर लोकही असतात. या ९ च्या शिफ्टसाठी ते कितीतरी लवकर निघतात. त्यांना नाश्ता मिळाला पाहिजे. नाश्ता मिळाला की ऊर्जा येते. त्यानंतर सगळे आनंदाने काम करतात. मग एक तास उशिरा सोडलं तरी काही बोलत नाहीत.”
“सचिनजींची आणखी एक गोष्ट अशी की, जे ते खातात, तेच आपल्याला देतात. दुसरीकडे कलाकार, टेक्निशियन, इतरांसाठी वेगळं जेवण, नाश्ता असतो; पण, सचिनजींकडे तसं नसतं. ते जे खातात, तेच ते इतरांनाही देतात. त्यांच्या या स्वभावामुळेच ते आजही यशस्वी आहेत.”
पुढे अशोक सराफ यांच्याबाबत जयंत वाडकर म्हणाले, “अशोकमामा म्हणजे कठोर शिस्तीचे. डायलॉग म्हणताना अचानक दुसरी वाक्यं म्हणायची नाहीत. आम्ही त्यांना सांगून, रिहर्सल करूनच मग ती घ्यायचो.आजही ते कामाच्या ठिकाणी शिस्त पाळतात. शूटिंगच्या आधी अर्धा-एक तास येऊन, ते डायलॉगचे मनन करीत असतात.”
दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना जयंत वाडकर यांनी, “‘तुझ्यावाचून करमेना’ हा मी पहिला चित्रपट केला. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, अशोकमामा, अलका कुबल हे सगळेच कलाकार होते. मी, राजन ताम्हाणे, विजय पाटकर, अजित सातभाई, वर्षा उसगांवकर आमची सगळ्यांची पहिली फिल्म होती.
“त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट गेली की, ते आमच्यासारख्या कलाकारांची नावे सुचवायचे. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रत्येक चित्रपटात होतो. आमचं ट्युनिंग चांगलं होतं. त्यामुळे सीन करताना मजा यायची. चिकट नवरा, कुठं कुठं शोधू मी तिला, सुना येती घरा, हमाल दे धमाल, आयत्या घरात घरोबा, एक गाडी बाकी अनाडी अशा अनेक चित्रपटांत आम्ही एकत्र काम केलं आहे. आज लक्ष्मीकांत असते, तर आम्ही आज वेगळ्या स्थानी असतो. लक्ष्मीकांत नक्कीच निर्माता झाला असता. मला आजही त्यांची आठवण येते”, या शब्दांत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.