Shubhangi Gokhale Ashadhi Wari Post : आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. आषाढी एकादशीनिमित्त असंख्य वारकरी दरवर्षी आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. हा नेत्रदीपक सोहळा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. जीवन समृद्ध करणारी ही वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जणू एक भूषणच आहे. वारीचा अनुभव अनुभवण्यासाठी लाखों वारकरी पालखीत सहभागी होत असतात.
सामान्य वारकऱ्यांबरोबरच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभाग घेत असतात. यंदाच्या वारीतही अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेकजण या वारीत विठुरायाचे भजन-कीर्तन करत वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहेत.
या वारीत निर्मळ मनाने आणि खऱ्या भक्तिभावाने विठुरायाला भेटायला जाणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच अनेक हौशी मंडळीही सहभागी होतानाचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत पंढरपूरच्या वारीचं रूप काहीसं बदललं आहे. सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यापुरतं काहीजण या वारीत सहभागी होतात. याबद्दल मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.
आजवर अनेक नाटक, मालिका तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शुभांगी गोखले सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. अशातच त्यांनी सोशल मीडियावर वारीबद्दल आणि या वारीत सहभागी होणाऱ्या काही हौशी वारकऱ्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. शुभांगी गोखले यांनी एक फोटो पोस्ट केला आहे; ज्यात विठ्ठल उभा असून त्याच्यासमोर संत तुकाराम दिसत आहेत.
अभिनेत्री शुभांगी गोखले इन्स्टाग्राम पोस्ट
या फोटोखालील कॅप्शनमध्ये त्या असं म्हणतात, “खूप वर्षांपासून मनात येत राहतं की, वारी वर्षानुवर्ष शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठ्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं आणि केळी वाटायची. मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या. असे अनेक प्रकार करून त्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा. कशासाठी?”
यानंतर त्या असं म्हणतात, “काही दिवसांत ‘काजवा महोत्सव’ नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा मिलनाचा काळ. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशाने तिला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेसचा प्रकाश आणि बडबड करून घोळक्याने तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची. खूनच करायचा. खूप लिहायचंय, पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी… पांडुरंगा.. सांभाळ रे…”
शुभांगी गोखले यांनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टखाली अनेकांनी त्यांच्या मताशी सहमत असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, या पोस्टमधून त्यांनी कोणाचे नाव घेतलं नाही. पण या वारीत सोशल मीडियावरील फक्त रीलसाठी गर्दी करणाऱ्यांबद्दल त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे.