सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या उत्साह आणि ऊर्जेसाठीदेखील ओळखला जातो. सध्या अभिनेता ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. तो सहभागी स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देताना दिसतो.

आता लवकरच सिद्धार्थ जाधव ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भरत जाधव व सिद्धार्थ जाधव हे एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे प्रेक्षक या जोडीची धमाल पाहण्यास उत्सुक आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याची त्याच्या मुलींबरोबर कशी बॉण्डिंग आहे, यावर वक्तव्य केले आहे.

त्या जेव्हा माझ्याकडे हट्ट करतात…

सिद्धार्थ जाधवने नुकतीच अजब गजब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारलं की तुझं आणि तुझ्या मुलींचं स्वरा-इराचं नातं कसं आहे? यावर अभिनेता म्हणाला, “आमचं डेंजर नातं आहे. स्वराच्या जन्मानंतर मी खर्‍या अर्थाने बाप अ‍ॅक्टर झालो होतो आणि इराच्या जन्मानंतर मी डबल बाप अ‍ॅक्टर झालो होतो. त्या दोघी कमाल आहेत. त्या जेव्हा माझ्याकडे हट्ट करतात, तेव्हा मला खूप मस्त वाटतं. आता स्वरा मोठी झालीय, नववीला गेली आहे, पण इरा लहान आहे. तिचं असं असतं की बाबा पाय दाबून दे.”

पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “त्या यूट्यूब वगैरे बघत असतात. दोघींनाही माझे काम आवडते. दोघींना माझी एनर्जी आवडते. त्यांना मी सांगितलं की मी तुमचा छोटा भाऊ आहे, तर त्या मला राब राब राबवून घेतात. पाय दाबून वगैरे घेतात, पण मला ते आवडतं; ते कनेक्शन मस्त वाटतं.”

दोन मुलींचा बाप असल्याच्या भावना व्यक्त करीत सिद्धार्थ जाधव म्हणाला, “मुलींचा बाप असणं ही मजा असते. माझ्या पप्पांनी मला असंच ठेवलंय. दहावीच्या परीक्षेत मला इंग्रजीचा पेपर कठीण गेला होता, तर ते मला म्हणाले होते की घरी ये, काही काळजी करू नको. कितीही मार्क पडू दे, तुझा बाप आहे. मी तोच आत्मविश्वास माझ्या मुलींना देतो. त्या जे म्हणतील ते मी त्यांना करून देतो. स्केटिंग, बास्केटबॉल, क्रिकेट त्यांना जे आवडेल ते मी त्यांना करू देतो. मला पोलिस व्हायचं होतं, तर मी अभिनेता झालो, त्यामुळे पुढे काय होणार हे माहीत नसतं; त्यामुळे आनंद घ्या असं मी त्यांना म्हणतो. पत्नी तृप्ती त्यांना छान सांभाळते.

“जबाबदारी येते. एक चित्रपट केला होता. त्यात गच्चीवरून उडी वगैरे मारली होती. आता तसं काही करत नाही. जसं मला माझ्या आई-वडिलांसाठी करायचं आहे, तसं इराच्या आई वडिलांसाठीसुद्धा करायचं आहे, त्यामुळे फिटनेस सांभाळतो”, असे म्हणत वडील झाल्यानंतर त्यांची मुलांची काळजी घेण्यासाठी स्वत:ची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावर असते, असे सिद्धार्थ जाधवने वक्तव्य केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेला आता थांबायचं नाय हा चित्रपट १ मे २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. तसेच अभिनेता पुन्हा एकदा साडे माडे ३, हुप्पा हुय्या २ या चित्रपटांतूनदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.