२८ एप्रिल रोजी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. तर आता या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारदेखील हा चित्रपट पाहून भारावून गेले आहेत. हा चित्रपट पाहून गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने केलेली पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे, तर सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. हा चित्रपट पाहून सर्व जण सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया लिहीत आहेत. आता अवधूत गुप्तेनेही हा चित्रपट पाहून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ने IMDB साईटवर सलमान खानच्या चित्रपटाला टाकलं मागे, मिळवले ‘इतके’ रेटिंग्ज

त्याने सोशल मीडियावर हा चित्रपट बघतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलं, “‘महाराष्ट्र शाहीर’ – मराठी चित्रपट सृष्टीला अभिमान वाटावा असा…साजरा करण्यासारखा सिनेमा काल मित्रांसोबत पाहिला! ‘मी वसंतराव’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ – दोन गायकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट जवळपासच्या कालावधीमध्ये प्रदर्शित झाले आणि पिढ्यान् पिढ्या गेल्या तरी देखील, शास्त्रीय असो वा लोकसंगीत गायक, आम्हा गायकांच्या आयुष्यातील संघर्ष हा फारसा बदललेला नाही याची जाणीव झाली.”

हेही वाचा : “फक्त त्याची बायको म्हणूनच नव्हे तर…,” अखेर अंकुश चौधरीची पत्नी दीपाने ‘त्या’ प्रश्नांवर सोडलं मौन; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे त्याने लिहिलं, “अमित दोलावत, निर्मिती ताई, दुष्यंत, सना आणि सर्वच कलाकारांची कामे प्रचंड आवडली ! मात्र अंकुशच्या आजवरच्या कामामध्ये हे सर्वोत्कृष्ट काम आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. अजय-अतुलचे संगीत नेहमी प्रमाणे अप्रतिम! केदार, तुझी मेहनत आणि बाबांवरचं तुझं प्रेम प्रत्येक फ्रेम मधून ओसंडून वाहताना दिसतंय. ते जिथे कुठे असतील तेथून तुला भरभरून आशीर्वाद देत असणार हे नक्की !!” आता त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अभिनेता अंकुश चौधरीनेही त्याची ही पोस्ट शेअर करत त्याचे आभार मानले आहेत.