Zapuk Zupuk Box Office Collection Day 7 : ‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा पहिला मराठी चित्रपट ‘झापुक झुपूक‘ रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. ‘झापुक झुपूक’ शुक्रवारी (२५ एप्रिल २०२५ रोजी) रिलीज झाला. या चित्रपटाने एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले ते जाणून घेऊयात.
‘झापुक झुपूक’ हा केदार शिंदे दिग्दर्शित कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात मराठीतील अनेक आघाडीचे कलाकार आहेत. ‘झापुक झुपूक’ च्या टीझर व ट्रेलरची प्रचंड चर्चा झाली होती. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती, पण रिलीजनंतर मात्र त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. ‘झापुक झुपूक’च्या एका आठवड्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून याचा अंदाज येतो.
‘झापुक झुपूक’च्या सातव्या दिवसाची कमाई खूपच कमी झाली. सहाव्या दिवसाच्या तुलनेत सातव्या दिवशी कलेक्शनमध्ये घसरण झाली. या चित्रपटाची सातही दिवसांची कमाई लाखांमध्ये झाली. ‘झापुक झुपूक’चं एका आठवड्याचं कलेक्शन एक कोटींपेक्षा जास्त झालं आहे.
‘झापुक झुपूक’चे एका आठवड्याचे कलेक्शन
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने शुक्रवारी म्हणजेच पहिल्या दिवशी २४ लाख आणि दुसऱ्या दिवशीही २४ लाख कमावले. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने १९ लाख, चौथ्या दिवशी १४ लाखांचा गल्ला जमवला. ‘झापुक झुपूक’ने पाचव्या दिवशी १७ लाख रुपयांचे कलेक्शन केले. सहाव्या दिवसापासून कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘झापुक झुपूक’ने सहाव्या दिवशी ९ लाख रुपये कमावले आणि सातव्या दिवशी ५ लाख रुपयांची कमाई केली. ‘झापुक झुपूक’चे वर्ल्ड वाइड कलेक्शन १.२४ कोटी रुपये झाले आहे.
‘झापुक झुपूक’ बद्दल बोलायचं झाल्यास केदार शिंदे यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्ये या सिनेमाची घोषणा केली होती. शिंदे व त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन सहा महिन्यांत हा चित्रपट तयार केला आणि प्रेक्षकांच्या भेटीला आणला.
‘झापुक झुपूक’ला प्रेक्षक मिळत नसल्याने थिएटर रिकामे असल्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. चित्रपट न पाहता टीका करणाऱ्यांचा त्यांनी इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये खरपूस समाचार घेतला. तसेच सूरजच्या चाहत्यांना हा चित्रपट हिट करण्याचं आवाहन केलं होतं.