‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. ‘झापुक झपूक’ असं सूरजच्या नव्या चित्रपटाचं नाव असून केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला आहे. नुकताच केदार शिंदेंनी चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्यावर्षी ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची घोषणा केली होती. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असून या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार, असं केदार शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर डिसेंबर २०२४च्या अखेरीस चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला आणि आता चित्रपटाचं चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे.

केदार शिंदे व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “बाप्पाच्या आशीर्वादाने सूरज चव्हाणच्या म्हणजेच ‘झापुक झुपूक’ या धमाल चित्रपटाचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं. एका बुक्कीत टेंगूळचं…तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असून दे…२५ एप्रिलपासून भेटूया आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!”

या व्हिडीओमध्ये केदार शिंदे सूरज चव्हाणला पॅकअप म्हण, असं सांगताना दिसत आहेत. तेव्हा सूरज म्हणतो, “गॅपअप.” यामुळे सेटवर हशा पिकतो. त्यानंतर सूरज आणि ‘झापुक झुपूक’ चित्रपटाची टीम जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. केदार शिंदेंनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून चाहते ‘झापुक झुपूक’ चित्रपट सुपरहिट होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. तसंच काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सूरज चव्हाणनेदेखील मरीमातेकडे प्रार्थना करतानाचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “मित्रांनो आपल्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं…तुमचे आशीर्वाद आणि प्रेम माझ्याबरोबर असुद्या…आई मरी माता, ॐ नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘झापुक झुपूक’ चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार?

दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे झळकणार आहेत. त्यामुळे आता सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.