मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिजमध्ये कामगिरी बजावत स्वप्नील जोशीने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. उत्तर रामायणामध्ये कुशची भूमिका साकारत बालकलाकार असलेल्या स्वप्नीलने १९८९ रोजी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा सोहळा समस्त भाविकांसाठी खूप खास असून अयोध्येत मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. या सोहळ्याला आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशातच आता मराठमोळ्या स्वप्नील जोशीनेही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. याबद्दल स्वप्नीलने आपल्या भावना व्यक्त करत त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा… रोहिणी हट्टंगडी यांना मिळालं वाढदिवसाचं खास सरप्राईज! अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान मिळाल्या शुभेच्छा

स्वप्नीलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्याने मुंबई ते अयोद्धेचा प्रवास दाखवला आहे. स्वप्नीलबरोबर त्याचा मित्र सौरभ गाडगीळदेखील या प्रवासात सहभागी झाला होता. या व्हिडीओला कॅप्शन देत स्वप्नीलने लिहिले, “२२ जानेवारी २०२४ हा दिवस माझ्यासाठी/ सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता, प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता ! प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीमधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं! तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही, पण एक मात्र ठरवलं होतं, ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्रीरामचद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं.”

स्वप्नीलने पुढे लिहिलं, “काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला आणि माझ्याबरोबर होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभूंचं दर्शन, शरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता… सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं! हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी, ‘याजसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटलं! प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना ! || जय श्रीराम || “

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला रणवीर सिंहबरोबर करायचंय काम; म्हणाली, “भूमिका कशी…”

दरम्यान, प्रसाद ओकच्या ‘सुटका’ या आगामी चित्रपटात स्वप्नील जोशी झळकणार आहे; तर १ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाद्वारे स्वप्नील जोशीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय.