Tejaswini Pandit on Politics: अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही तिच्या अभिनयासाठी जितकी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठीदेखील ओळखली जाते. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्री व्यक्त होताना दिसते.
मराठी भाषेवरील तिच्या वक्तव्यांमुळेदेखील ती मोठ्या चर्चेत होती. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीत तरूणांनी करिअर म्हणून राजकारणात जावं का? यावर वक्तव्य केले आहे.
तेजस्विनी पंडित काय म्हणाली?
तेजस्विनी पंडितने नुकतीच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “हो, तरूणांनी राजकारणात यायला पाहिजे. आपण त्याला चिखल म्हणतो. पण, आपल्याला तो चिखल साफ करायचा नसतो.”
पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, “तुम्ही राजकारणात उतरुनच समाजकारण करू शकता, असं काही नाही. समाजकारण करायला राजकारणात असायला पाहिजे असंही नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पण, चांगले राज्यकर्तेसुद्धा तितकेच महत्वाचे असतात.
ती राजकारणात जाणार का? अशा आशयाच्या प्रश्नावर तेजस्विनी म्हणाली, “मला समाजकारण करण्यासाठी राजकारणात उतरावं लागेल असं काही नाही. मी माझ्या पद्धतीने समाजकारण करत आहे. कुठल्याही बाबतीत व्यक्त होणं, ते चूक असो किंवा बरोबर, ते प्रत्येकासाठी वेगळं असतं. माझं म्हणणं आहे की तुमची भूमिका असायला हवी. चूक, बरोबर लोक त्यांच्या विचारक्षमतेनुसार ठरवतात. आपल्याला वाटतं ते आपण व्यक्त करायला पाहिजे. पण, आपण कोणाविषयी व्यक्त होतोय, आपण कुठल्या भाषेत व्यक्त होतोय, हे तितकंच महत्वाचं आहे.”
”आता तुमच्या हातात सोशल मिडिया आहे, म्हणून सतत कोणाविषयीही बोलावं किंवा वक्तव्ये करावेत, असं नाही. तुम्ही जबाबदारीने व्यक्त व्हायला पाहिजे”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचे मत मांडले.
तेजस्विनी पंडित लवकरच ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शिन संजय जाधव यांनी केले असून निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे. तेजस्विनीसह सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर या चित्रपटात दिसणार आहे. १८ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.