Tejaswini Pandit on trolling: अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘तू ही रे’, ‘येरे येरे पैसा’, अशा अनेक चित्रपटांत तिने विविध भूमिका साकारल्या आहेत.
आता अभिनेत्री लवकरच संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तेजस्विनीबरोबरच सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, संजय नार्वेकर यांसह इतर कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. सध्या अभिनेत्री या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याचे दिसत आहे.
तेजस्विनी पंडित अभिनयाबरोबरच तिच्या स्पष्टोक्तीपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ट्रोलिंगबाबत वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊ…
“तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा…”
अभिनेत्रीने नुकतीच ‘आरपार’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “मराठी माझी मातृभाषा आहे. मी या क्षेत्रामध्ये काम करते. महाराष्ट्रात राहते. मी या भाषेवर गेली २२-२३ वर्षं स्वत:चं पोट भरत आहे. मग मी या भाषेसाठी उभी राहणार नाही, तर कोण राहणार? हे वैयक्तिक आहे. बाकीचे कलाकार का बोलत नाहीत, हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे. मी आता माझ्या क्षेत्रातील लोकांच्या बाजूने बोलत आहे, असं समजू नये. पण, कदाचित मी प्रतिनिधित्व करतेय, असं आपण म्हणू शकतो.”
“ट्रोलिंगबाबत असं होतं की, तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, जेव्हा नकारात्मकता नको वाटते. लोकांचं कुठे ऐकायचं, असं वाटतं. सगळ्यांना झेपत नाही. सगळ्यांना ती नकारात्मकता नको असते. त्यामुळे खूप लोक त्या नकारात्मकतेमुळे बोलत नाहीत. ज्या पद्धतीने, ज्या भाषेत ट्रोलर्स ट्रोल करतात, त्यामुळे ती नकारात्मकता येते.”
“माझं ट्विटर जर उघडून बघितलं, जे मी बघितलं नाही. तर तिथे खूप वेगवेगळ्या कमेंट्स असतात. पण नोटिफिकेशन येत असतात. मी आता त्याचं नोटिफिकेशनसुद्धा बंद केलं आहे. लोकांना जर मला म्हणायचं आहे की, तू गेंड्याच्या कातडीची आहेस. तर हो मी गेंड्याच्या कातडीची आहे. ट्रोलिंगमुळे मला काही फरक पडणार नाही.”
“मी ट्रोलर्सना घाबरत नाही. घाबरत नाही म्हणजे मला काही फरक पडत नाही; पण समोरच्याला पडू शकतो. म्हणून तो कदाचित व्यक्त होत नाही. प्रत्येक वेळेला सोशल मीडियावर येऊन व्यक्त झालं, म्हणजे मी एखादी गोष्ट करत आहे, असं होत नाही.”
“नुकतीच आषाढी एकादशी झाली. मी लोकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. याचा अर्थ मला काही वाटतच नाही, असा नाही. कोणाचा तरी मृत्यू झाला आणि मी त्याबाबत काही बोलले नाही. मी आरआयपी (RIP) लिहिलं नाही, तर त्याचा अर्थ मला दु:ख झालं नाही, असा होत नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही सोशल मीडियावर येऊन बोलला म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी केल्या आहेत, तुम्ही संवेदनशील आहात, मुद्देसूद बोलत आहात, म्हणजेच तुम्ही स्पष्टवक्ता आहात, असं होत नाही.
“मला वाटतं म्हणून मी बोलते. काही लोकांना वाटत नाही म्हणून ते बोलत नाहीत. पण, त्यांनाही वाटत असेल ना. लोक गृहीत का धरतात की कोणाला काही वाटत नाही. वाटत असेल. पण जेव्हा मोठ्या गोष्टी घडतात, घटना घडतात. जेव्हा प्रश्न राज्याचा येतो, जेव्हा तुमच्या भाषेचा प्रश्न असतो. तेव्हा त्या भाषेच्या बाजून उभं राहणं कर्तव्य आहे”, असे म्हणत अभिनेत्रीनं तिचे मत मांडलं.
पुढे अभिनेत्रीनं असाही खुलासी केला की, स्पष्ट बोलल्यामुळे अनेक गुंड माझ्या घराखाली फेऱ्या मारून गेले आहेत. तेजस्विनी पंडित इथेच राहतात का, असंही विचारून गेले आहेत. मला धमक्यांचे फोन आले आहेत. पण, मी घाबरले नाही.
याचं दडपण येत नाही का? यावर अभिनेत्री म्हणाली की, व्यक्त व्हायचं की नाही हे माझ्या हातात आहे. जर तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल, तर त्याबरोबरीनं येणाऱ्या गोष्टीदेखील स्वीकारता आल्या पाहिजेत. नाही तर व्यक्तच होऊ नका.
दरम्यान, येरे येरे पैसा ३ या चित्रपटाची निर्मिती अमेय खोपकर यांनी केली आहे. हा चित्रपट १८ जुलैला प्रदर्शित होणार आहे.