Tejaswini Pandit Education : ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी पंडित सध्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अभिनय क्षेत्रात एन्ट्री घ्यायची असं तेजस्विनीने कधीच ठरवलं नव्हतं. तिला फॅशन डिझायनिंगची प्रचंड आवड होती. दहावी उत्तीर्ण झाल्यावर तेजस्विनीने अचानक सिनेविश्वाकडे वळण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तिने नुकत्याच ‘आरपार मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
तेजस्विनी पंडित म्हणाली, “दहावी झाल्यावर मला इंटिरिअर किंवा फॅशन डिझायनिंग करायचं होतं. त्यातही कल फॅशन डिझायनिंगकडे जास्त होता… तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, तेजू आपल्याकडे पैसे नाहीयेत. त्यावेळी इंटिरिअर आणि फॅशन डिझायनिंग या दोन्ही कोर्सेसची फी जवळपास ६० ते ८० हजार एवढी होती…ही गोष्ट २००२ मधली आहे. बाबांनी पैशांचं सांगितल्यावर मी म्हणाले काहीच हरकत नाही. पण, हे देखील महत्त्वाचं की, मला नॉर्मल शिक्षण म्हणजेच अकरावी-बारावी वगैरे करायचं नव्हतं. बाबांना मी सांगितलं आता पैसे नसतील तर नको करुयात मी जेव्हा पैसे कमवेन तेव्हा शिक्षण पूर्ण करेन.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “बाबांशी सगळं माझं बोलणं झालं आणि त्यानंतर माझी सिनेक्षेत्रातच एन्ट्री झाली. पुढे, मी सिनेसृष्टीत इतकी रमले की मला शिक्षणाचा विसर पडला. मग, काम इतकं वाढलं की त्यानंतर शिक्षणासाठी वेळच मिळाला नाही. शेवटी मी कथ्थक शिकायचं असं ठरवलं, मनीषा साठे या माझ्या गुरू आहेत. अचानक एकेदिवशी मला मुंबईतून काम आलं…मी मनीषा ताईंना सांगितलं आणि मी जाणारच नव्हते कारण माझं कथ्थक अपूर्ण राहिलं असतं. पण, ताई मला म्हणाल्या, शिकणं कधीही होऊ शकतं पण, करिअर पुन्हा येणार नाही. तू आता मुंबईला जा…आणि त्यानंतर मी देखील मुंबईला यायला तयार झाले.”
शिक्षण कमी असूनही व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय का घेतला याबद्दल तेजस्विनी सांगते, “संपूर्ण इंडस्ट्री मुंबईत असल्याने मला इथे येणं भाग होतं. माझी आई मुंबईला कधीच आली नव्हती…त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून तिचं खूप नुकसान झालं होतं. ती खरंतर खूप डिझर्व्हिंग अभिनेत्री होती पण, तिला खूप गोष्टी मिळाल्या नाहीत. म्हणून मी मुंबईला यायचं ठरवलं. मग, माझं करिअर सुरू झालं…२०१५ मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर मनात असं जाणवलं आता काहीतरी व्यवसाय देखील केला पाहिजे. पण, शिक्षण नसल्यामुळे व्यवसाय काय करायचा हे माहिती नव्हतं. पण, काम करताना कपड्यांचं फॅब्रिक, रंग या गोष्टी बारकाईने पाहिलेल्या असल्याने मला फॅशन डिझायनिंगमधल्या बऱ्याच गोष्टी माहिती होत्या. याचाच मला खूप फायदा झाला.”
“फॅशन डिझायनिंगबद्दल माहिती असल्याने तेजाज्ञा हा ब्रँड सुरू केला. मी आणि अभिज्ञा भावे आमचा तो ब्रँड होता, सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला होता. आम्ही दोघींनी त्या ब्रँडसाठी खूप काम केलं. यानंतर आता मी एक सलोन सुरू केलंय. कलाक्षेत्रात आपल्याला प्रत्येकवेळी काम मिळेलच असं नाही. इथे गॅरंटी कशाचीच नाही…त्यामुळे आपल्या हाताशी एक व्यवसाय असावा असं मला वाटत होतं. यातूनच मग मित्रांच्या साथीने सलोन सुरू केलं. आता हा व्यवसाय कसा वाढवता येईल याचे प्लॅन्स सुरू आहेत.” असं तेजस्विनी पंडितने सांगितलं.