Upendra Limaye Meeting Superstar Rajinikanth : राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये त्यांच्या बहुरंगी अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असतात. ‘जोगवा’, ‘मुळशी पॅटर्न’ ते बॉलीवूडमध्ये गाजलेल्या ‘अ‍ॅनिमल’पर्यंत…. उपेंद्र लिमयेंच्या अभिनयाची जादू कायमच प्रेक्षकांना भुरळ घालते. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उपेंद्र लिमयेंनी सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेत त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

उपेंद्र लिमये सांगतात, “माझ्या करिअरची सुरुवात ही रंगभूमीपासून झाली. या काळात मुख्य प्रवाहात काम करणाऱ्या स्टार्सनी मला कायम प्रभावित केलं. अमिताभ बच्चन, कमल हासन, मिथुन चक्रवर्ती ते अगदी गोविंदापर्यंत सगळेच अभिनेते माझ्यासाठी या प्रवासात आदर्श होते. या सुपरस्टार्सच्या फळीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेते म्हणजेच रजनीकांत सर. त्यांची भेट घेण्याचा नुकताच योग आला. खरंतर हा अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे.”

उपेंद्र लिमये पुढे म्हणाले, “रजनीकांत सरांना भेटण्यासाठी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर प्रचंड गर्दी असते. कॅमेरा, कॅमेरामन, त्यांचं युनिट अशी सगळी माणसं व्हॅनिटीबाहेर उभी असतात. याचठिकाणी त्यांच्याबरोबर प्रत्येकाला फोटो काढण्याची संधी मिळते. काही खास लोकांनाच मेकअप रूममध्ये बोलावून फोटो दिले जातात आणि या खास लोकांमध्ये त्यांनी मला सामावून घेतलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

रजनीकांत यांच्याबरोबरची भेट कशी होती याबद्दल सांगताना उपेंद्र म्हणतात, “सरांच्या मेकअप रूमचा दरवाजा उघडल्यावर प्रचंड दडपण आलं होतं. कारण, साक्षात रजनीकांत सर माझ्यासमोर उभे होते. ते सुपरस्टार असले तरीही त्यांची त्यांचे पाय आजही मातीत घट्ट रोवलेले आहेत याची जाणीव त्यांच्याशी संवाद साधताना झाली. त्यांना नमस्कार करून मी त्यांच्याशी मराठीत संवाद साधला. त्यांना म्हणालो, “मला माहितीये तुम्हाला मराठी येतं त्यामुळे मला तुमच्याशी मराठीतच बोलू द्या” यावर ते मनापासून हसले आणि म्हणाले, “माझं मराठी बेळगावकडचं बरं का” त्यांच्या बोलण्यात सुद्धा प्रचंड नम्रता होती. त्यानंतर गप्पा मारताना माझं तेलुगू सिनेमातील काम त्यांनी पाहिलंय असं सांगितलं. सर म्हणाले, “तू चांगलं काम केलं आहेस” त्यांचे ते शब्द मी कायमस्वरुपी हृदयात कोरणार आहे. त्यांनी माझं काम पाहिलंय या विचारानेच मी प्रचंड सुखावलो.”

“रजनीकांत सरांचा साधेपणा पाहून मी थक्क झालो होतो. एकदा यश मिळालं की काहीजण हवेत जातात. पण, त्यांनी हे स्टारडम खूप उत्तमप्रकारे हाताळून आपल्या साधेपणाने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. ही माझ्यासाठी फक्त भेट नव्हती. यामुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाला. खरंतर स्टारडम हे पैसा, प्रसिद्धीत नाहीये तर, आपल्या स्वभावात नम्रता असावी याची जाणीव करून देण्यात आहे. रजनीकांत सरांना मनापासून नमस्कार” असं उपेंद्र लिमयेंनी म्हटलं आहे.