पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी सध्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. १६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. मात्र, यामागचं कारण हुंड्यासाठीचा छळ व कौटुंबिक हिंसाचार असल्याचा आरोप वैष्णवीच्या पालकांनी केला आहे,
वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यभरातील राजकीय मंडळींसह कलाकारांनीही या घटनेबद्दल राग व्यक्त केला आहे. अभिनेता हेमंत ढोमेने एक्स पोस्ट शेअर करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच आता या प्रकरणावर अभिनेता पुष्कर जोगने देखील पोस्ट शेअर करत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
मराठी अभिनेता पुष्कर जोगने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत वैष्णवी हगवणे प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये केली आहे.
“खूप लाज वाटते… जे काही महाराष्ट्रामध्ये घडतंय… आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी… आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता…पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोल करतंच.. पण, आता गप्प बसून चालणार नाही ना…माणुसकी आणि आपल्या समाजातील निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या. Justice For Vaishnavi” असं पुष्कर जोगने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोनं, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं.
दरम्यान, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील संशयित शशांक हगवणे (पती), लता हगवणे (सासू) आणि करिश्मा हगवणे (नणंद) यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार आहेत.