अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा वेड हा चित्रपट उद्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि गाणी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. या चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यानंतर आता अभिनेता जितेंद्र जोशीने त्याला हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल सांगितले आहे.

जितेंद्र जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जितेंद्र जोशीने रितेश आणि जिनिलीया बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबरच त्याने एक कॅप्शन शेअर केली आहे. त्यात त्याने त्याला हा चित्रपट कसा वाटला याबद्दलचे मत मांडले आहे.

जितेंद्र जोशीची पोस्ट

“आज वेड चित्रपट पाहिला आणि वेड लागलं!!
रितेश भाउंचं दिग्दर्शनात पदार्पण होतंय परंतु आपला 50 वा चित्रपट करावा या सफाईने आणि बारकाव्या ने त्यांनी दिग्दर्शन केलंय आणि अभिनय सर्वोत्तम केलाय. जेनीलिया देशमुख यांच्या कडून त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोत्तम काम काढून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. शुभंकर तावडे च्या प्रामाणिक कामाला तोड नाही. रवी राज ने त्याच्या पहिल्याच सिनेमात साकारलेला खलनायक अप्रतिम . जिया शंकर सुद्धा उत्तम परंतु या चित्रपटात असलेल्या खुशी नावाच्या अगदी नावाप्रमाणेच असलेल्या चिमुरडी ने मला खरोखर वेड लावलं. बाकी अशोक मामांविषयी मी काय बोलू? ते करू शकत नाहीत असा कुठलाही रोल नाही. या वयात, इतके सिनेमे केल्यानंतर देखील मला थक्क करून सोडलं त्यांनी!!
आमच्या प्राजक्त देशमुख या वेड्या लेखकाचे संवाद जेनेलिया देशमुखयांच्या डोळ्यां इतके, रितेश भाऊंच्या प्रामाणिकपणा इतके आणि अशोक मामांच्या अभिनयाच्या प्रेमा इतकेच बोलके आहेत. अजय अतुल हे मराठी मनाला पडलेलं अभूतपूर्व स्वप्न आहे जे त्यांच्याच सुरां मार्फत आपण बघत राहतो आणि त्याला रितेश भाऊंनी बोलकं केलं आहे.
सौरभ भालेराव चं पार्श्वसंगीत सिनेमाचा आत्मा आहे.
रोहन मापुस्कर या ही कास्टिंगसाठी तुझे आभार.
वेड चित्रपटाने मराठी सिनेमाला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होऊन हाऊसफुल्ल चे बोर्ड लागतील अशी आशा आहे. मराठी सिनेमा सर्वार्थाने मोठा करण्याची किमया फक्त प्रेक्षकांच्या हाती आहे आणि यंदा ही ते होईल अशी अपेक्षा.
भाऊ तुम्ही कडक फिल्म बनवली. आता थांबू नका!! लव्ह यू”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान वेड या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख हा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. २० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर आता रितेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही तब्बल १० वर्षांनी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. यासाठी तिने वेड या मराठी चित्रपटाची निवड केली आहे. या पूर्वी जिनिलियाने हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.