Sachin Pilgaonkar Praises Daughter Shriya Pilgaonkar : सचिन पिळगांवकर व सुप्रिया पिळगांवकर ही जोडी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांची लेक श्रियाने देखील या क्षेत्राची निवड करून, त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. अशातच आता लेकीच्या कामाचं कौतुक म्हणून सचिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सचिन यांनी सोशल मीडियावर श्रियाच्या भूमिकेचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतं. सचिन व सुप्रिया यांनी तिची ‘मंडला मर्डर्स’ ही वेब सीरिज पाहिली. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर लेकीचं कौतुक करीत पोस्ट केली आहे. सचिन यांनी तिचे वेब सीरिजमधील काही फोटो शेअर करीत कौतुक केलं आहे.
लेक श्रियाबद्दल काय म्हणाले सचिन पिळगांवकर ?
सचिन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत म्हटलं, “तुला जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. आम्हाला तुझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे. तू ‘मंडला मर्डर्स’मध्ये साकारलेली रुक्मिणी ही भूमिका तुझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे.”
अभिनेते पुढे म्हणाले, “तू दाखवून दिलंस की, फक्त काही सीनमधूनसुद्धा एक कलाकार त्याच्या कामानं प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडू शकतो.” यावेळी त्यांनी सुप्रिया यांच्याबरोबरचेही काही फोटो शेअर केले असून, त्यामधून दोघांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.
श्रियाची ‘मंडला मर्डर्स’ ही सीरिज नुकतीच ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये तिनं केलेल्या कामासाठी ही पोस्ट होती. श्रियानं यापूर्वीसुद्धा अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. सचिन व सुप्रिया पिळगांवकर हे दोघेही अनेकदा त्यांच्या लेकीच्या कामाचं कौतुक करत असतात.
दरम्यान, श्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर बॉलीवूड चित्रपट, तसेच वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘तिनं फॅन’, भांगरा पा ले’, ‘हाथी मेरे साथी’ यांसारख्या चित्रपटांत आणि ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्ज’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ताजा खबर’ यांसारख्या सीरिजमध्येही काम केलं आहे. श्रियानं काही शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शनही केलं आहे.