Alka Kubal lost 9 kg: ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे मोठे योगदान आहे. आता मात्र त्या अभिनयामुळे नाही तर त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
अलका कुबल काय म्हणाल्या?
अलका कुबल यांनी काही दिवसांपूर्वीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केले होते, असा खुलासा केला. तसेच, त्याचे कारण काय होते, यावरदेखील त्यांनी वक्तव्य केले.
वजन कमी करण्याचं कारण काय? यावर अलका कुबल म्हणाल्या, “मी यावर्षी साठी पूर्ण करेन. त्यामुळे मला वाटलेलं की आता आपली निवृत्त होण्याची वेळ आहे. आता आपल्याला कुठे कामं मिळणार असं वाटलेलं. पण आता खूप कामांचा ओघ सुरू झाला आहे. चित्रपट, हिंदी वेब सीरीजमधील भूमिकांसाठी विचारणा झाली. तर त्यामुळे मला असं वाटायला लागलं आता आपण थोडं फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे.
२००७मध्ये माझा अपघात झाला. त्यामुळे माझ्या सर्जरी झाली होती. त्यामुळे मी फिटनेसकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे माझं वजन प्रचंड वजन वाढलं होतं. कशाला बारीक व्हायचं, असं वाटायला लागलं होतं. त्यानंतर स्क्रीनवर स्वत:ला पाहिल्यानंतर वाटलं की थोडं वजन कमी करायला पाहिजे. त्यानंतर मी चालणं सुरू केलं. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला जिद्दीने वजन कमी करायचं असेल तर अमुक या गोष्टी करा. त्यानंतर आता मी दररोज ५० मिनिटे चालते. मी दीड महिन्यात ९ किलो वजन कमी केलं. आपल्याला कोणीतरी प्रेरणा देणारं कोणीतरी लागतं. तर माझ्या बाबतीत मला असं वाटतं की आमचे डॉक्टर निमित्त ठरले.
पुढे अलका कुबल म्हणाल्या, “मी आधीपासूनच माझ्या फिटनेसकडे लक्ष दिले आहे. मला दोन मुली झाल्यानंतरही मी तंदुरुस्त होते. कारण मी नायिकेच्या भूमिकेत असायचे. मुली झाल्यानंतर सव्वा महिन्यानंतर मी जीम सुरू केली. कारण- मी त्यावेळी खूप काम करत होते. मी त्यावेळी वर्षाला १०-१२ सिनेमे करत होते.मुली तीन वर्षांच्या होईपर्यंत सेटवर यायच्या. माझ्या अपघातानंतर माझं वजन वाढलं.
याबरोबरच, अभिनय क्षेत्रात जेव्हा त्या नव्हत्या तेव्हा त्याचं आयुष्य कसं होतं? यावर त्यांनी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. गोरेगावला बीएमसी कॉलनीमध्ये बैठी घरं आहेत.त्या घरांमध्ये आम्ही राहिलो आहे. त्यामुळे आमचं खेळणं रस्त्यावर होतं. आम्ही त्या लहानपणाचा खूप आनंद घेतला आहे. लगोरी, बॅडमिंटन सगळे खेळ खेळलो आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मी १४ वर्षांची असताना माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या आईने आमच्या चारही भावंडांना खूप छान वाढवलं आहे. खूप कष्टाने तिने वाढवलं आहे. ती शिक्षिका होती. त्यावेळी पगारही खूप नव्हते. ती निवृत्त झाली, त्यावेळी २०-२२ हजार पगार होता. पण त्यावेळी ३००-५०० रुपये पगार होता, त्यात ती घर चालवायची. शाळा सुटल्यानंतर ती साड्या विकायला जायची. मी ते सगळं पाहिलं आहे. आईचं कष्ट मी विसरू शकत नाही. त्यामुळे सदैव जमिनीवर राहिले. कधीच कुठल्या गोष्टीची डोक्यात हवा गेली नाही. खाऊन-पिऊन सुखी होतो. आईचे संस्कार होते. त्यामुळे मी कधी चुकीच्या मार्गावर गेले नाही. कारण तिचा धाक होता. मागे वळून बघताना कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही.
दरम्यान, सध्या अलका कुबल ‘वजनदार’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसते.