Vishakha Subhedar shares heartfelt memories Of The Yere Yere Paisa 3 Movie : ‘येरे येरे पैसा ३’ हा बहुचर्चित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार यांसारखे कलाकार पाहायला मिळत आहेत. अशातच या चित्रपटाच्या निमित्ताने विशाखा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी शैलीद्वारे आजवर अनेकांना पोट धरून हसवलं आहे. त्यामुळे अभिनेत्री तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. विशाखाने नुकतीच ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यावेळी तिने चित्रपटाच्या टीमबरोबरचे काही खास फोटोसुद्धा शेअर केले आहेत.
विशाखाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टला मोठी कॅप्शनही दिली आहे. तिने त्यामधून म्हटले, “कलाकार म्हणून आपलं काम आपण कायमच प्रामाणिकपणे करायचं. त्यामुळेच नवीन कामं, भूमिका मिळतात. २०१७ मध्ये ‘ये रे ये रे पैसा’ जेव्हा पहिल्यांदा केला तेव्हा असंच समाधान वाटलं. उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकार यांच्याबरोबर धमाल आली”.
विशाखा पुढे म्हणाली, “आजपासून ‘ये रे ये रे पैसा ३’ प्रदर्शित झाला आहे. मराठीमध्ये क्वचितच असे फ्रँचायजी बघायला मिळतात. मला आनंद आहे की, अशा सिनेमाचा मीही भाग आहे. ही खात्रीसुद्धा आहे की, आम्हाला हा चित्रपट शूट करताना जेवढी मजा आली तेवढीच तुम्हा प्रेक्षकांना तो बघताना येईल. तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच कायम ठेवा. ‘ये रे ये रे पैसा ३’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जरूर बघा”.
दरम्यान, ‘येरे येरे पैसा ३’बद्दल बोलायचं झालं, तर त्यामध्ये मराठी कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळत आहे. उमेश कामत, तेजस्विनी पंडित व सिद्धार्थ जाधव यामधून प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार हे कलाकारसुद्धा त्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांतून पाहायला मिलत आहेत. चित्रपटाच्या यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘येरे येरे पैसा ३’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता होती.