Filmfare Marathi Awards 2025 : मराठी कलाविश्वात मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यंदा या सोहळ्याला मराठीसह बॉलीवूडचे काही कलाकार देखील उपस्थित राहिले होते. यावर्षी या सोहळ्यात आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.
याशिवाय ‘फुलवंती’, ‘गाठ’ अशा अनेक चित्रपटांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यंदा मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी पहिल्यांदाच या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. नम्रता संभेरावचं यावर्षी फिल्मफेअरचं पहिलंच नॉमिनेशन होतं आणि तिला पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, लोकप्रिय अभिनेता धैर्य घोलपला यंदाचा बेस्ट डेब्यू ( पदार्पण ) फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
धैर्य घोलपने राज ठाकरेंवर आधारित ‘येक नंबर’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी धैर्यला नुकताच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला असून त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
धैर्य घोलप लिहितो, “मी अत्यंत कृतज्ञ आणि जबाबदारीच्या भावनेतून हा पुरस्कार स्वीकारला आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम माझ्याबरोबर होती आणि म्हणून मी प्रतापसारखी भूमिका रुपेरी पडद्यावर साकारू शकलो. ‘येक नंबर’ टीम आणि ‘येक नंबर’ सिनेमा बनवणाऱ्या माझ्या सगळ्या एक नंबर माणसांना धन्यवाद”
दरम्यान, ‘येक नंबर’ हा मुख्य अभिनेता म्हणून धैर्यचा पहिलाच चित्रपट होता. यापूर्वी तो ‘अथांग’ नावाच्या वेब सीरिजमध्ये झळकला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ‘येक नंबर’ सिनेमाची निर्मिती केली आहे. यामध्ये तेजस्विनी आणि धैर्य घोलपसह सायली पाटील, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.