Ankita Walawalkar & Suraj Chavan : ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने सूरजला पाठिंबा देत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट लिहिली आहे. सूरजची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ सिनेमा २५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. खरंतर सूरजची क्रेझ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. पण, सध्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.
‘झापुक झुपूक’चे दिग्दर्शक केदार शिंदेंनी सुद्धा पोस्ट शेअर करत या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. अनेकांनी सूरजच्या सिनेमाचे ठरवून नकारात्मक रिव्ह्यू दिले असं त्यांनी लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं होतं. यावर आता अंकिताने देखील पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे.
अंकिता लिहिते, “सूरजचा ‘झापुक झुपूक’ चित्रपट मी आतापर्यंत ३-४ वेळा बघितला. खरंतर, मी आता सोशल मीडियावर गरीब कार्ड वापरून फेमस होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला सांगू इच्छिते की, सूरज फक्त गरीब आहे म्हणून आज त्या जागेवर नाहीये, ज्याला लिहिता वाचता येत नाही असा मुलगा, त्याने जे काम केलंय ना ते खरोखर कौतुकास पात्र आहे. त्याच्याकडून एखादी गोष्ट करून घेण्यात जास्त मेहनत आहे हे मला माहीत आहे. कारण, ७० दिवस २४ तास एकत्र राहिलोय… तुम्ही तर एडिटेड ‘बिग बॉस’ बघितलाय. जेव्हा ‘बिग बॉस’ने दिलेल्या निकषांच्या आधारावर मी सूरजला बाद करत होते तेव्हा मला जज केलं गेलं. पण, उद्देश तोच होता की त्याने त्याच्या गोष्टी सुधाराव्यात त्याला कळणं गरजेचं होतं की तो कुठे मागे पडतोय. त्यामुळे त्याच्याकडून चित्रपटासाठी आउटपुट काढून घेणाऱ्या केदार सरांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं खूप कौतुक…”
“मी आधी पण बोलले होते की इंडस्ट्रीमध्ये इफ्लुएन्सर क्रिएटर आणि अभिनेते यांच्या मध्ये एक दरी आहेच पण, कलाकाराला जसं जात धर्म नसतो, तसंच त्याला हे प्रेम सहानुभूती पूर्वक मिळालं असं म्हणू पाहणाऱ्यांनी त्याचं कलाकार म्हणून काम पण पहावं. सिनेमा पाहून त्यावर भाष्य करा, न पाहता टीका करू नका. या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाला तर त्याचं हे ही कारण आहे की सूरजचे फॅन्स गावाकडे आहेत आणि गावांमध्ये चित्रपटगृह नाहीत, काहींचं म्हणणं होतं की त्याला ग्रुम करून चित्रपट बनवला पाहिजे होता पण तशी इच्छा सूरजची पण हवी ना? म्हणून सूरज चव्हाण हे Character आहे तसंच Present केलं गेलंय…त्याने जे काम केलंय त्यावर आपण भाष्य करूया. त्या मुलाने या चित्रपटात क्षमतेपेक्षा सुंदर काम केलंय…आपण चित्रपटांकडे चित्रपट म्हणूनच बघायला शिकूया! जर महाराष्ट्रानेच सूरजला जिंकवलंय तर महाराष्ट्र हा चित्रपट डोक्यावर घेईलच…”आख्याना” माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!” असं अंकिता वालावकरने लिहिलं आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये जुई भागवत, हेमंत फरांदे, इंद्रनील कामत या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.