अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने उलटले असले तरी चित्रपटाची क्रेझ मात्र कायम आहे. या चित्रपटाची, त्यातील डायलॉगची चर्चा सोशल मीडियावर कायमच सुरु असते. प्रसाद ओकचा ‘धर्मवीर’ चित्रपट आणि त्यातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटानंतर महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर याचा परस्पर संबंध जोडला जात होता. मात्र नुकतंच प्रसाद ओकने यावर भाष्य केलं आहे.

नुकतंच प्रसाद ओकने न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्याने धर्मवीर चित्रपट, आनंद दिघेंवर प्रकाशित होणारे पुस्तक आणि महाराष्ट्रात झालेले सत्तांतर याबद्दल भाष्य केले. यावेळी प्रसाद ओकला ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणं आणि त्यानंतर झालेला सत्तापालट याचा खरोखर काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

यावर उत्तर देताना प्रसाद ओक म्हणाला, “खरोखर अगदी प्रामाणिकपणे एक सच्चा कलाकार म्हणून सांगायचं तर मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही. हा सत्तापालट होणार होता की नाही? तो धर्मवीरमुळे झाला की नाही? असं अनेक लोक म्हणतात. पण मला माहिती नाही.”

“धर्मवीर चित्रपटाने अचूक वेळ साधली यावरुन अभिनेत्यावर आरोप होण्याचं काही कारण नाही. मी तो एक चित्रपट म्हणून स्विकारला. एकतर अशी कलाकृती वारंवार करायला मिळत नाही. धर्मवीर सारखे चित्रपट १० ते १५ वर्षे बनत नाहीत. अशी भूमिका सतत वाट्याला येत नाही. जर समोरुन माझ्याकडे आनंद दिघेंची भूमिका येते तर ती जीव तोडून, जीवापाड प्रयत्न करुन ती करणे, त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, त्यांच्याकडून तितकंच प्रेम मिळायला हवं, याचा मी विचार केला.

आणखी वाचा : “मी लिहिलेलं ‘माझा आनंद’ पुस्तक….” आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकची मोठी घोषणा

“सत्ताबदल आणि सत्तांतर त्याच्यामुळे झालं की नाही याबद्दल बोलणं हा माझा प्रांत नाही. मी त्याकडे कधीही त्या दृष्टीने पाहिलं नाही. असं काही होईल याची आम्हाला एक टक्काही कुठेही जाणीव नव्हती”, असेही प्रसाद ओक म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाला. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.