महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना वाचा फोडणारा आणि विचारांना चालना देणारा ‘कॅम्पस कट्टा’ हा चित्रपट एका वेगळ्या धाटणीचा असून १८ एप्रिलला राज्यात तो प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक संजीव कोलते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मूळचे नागपूरकर आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले संजीव कोलते यांनी तानी, रंगकर्मी या चित्रपटाच्या यशानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित कॅम्पस कट्टा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी कोलते म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनावरील हा चित्रपट असला तरी या चित्रपटाची मूळ संकल्पना नागपूरची आहे. नागपुरातील वास्तव्यात कॅम्पस कट्टा काय असतो, त्यात एका प्रमुख नेत्याची काय भूमिका असते हे सर्व माहीत होते त्यावरून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विद्यार्थी आपल्या अस्मितेसाठी भांडत असताना त्याला एक व्यासपीठ हवे असते आणि त्यासाठी हा कट्टा तयार केला जातो.
गेल्या काही वर्षांत महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात राजकारणी नेत्याचा शिरकाव व्हायला लागला आहे. विद्यार्थ्यांना वाव राहिला नाही. विद्याथ्यार्ंना स्वातंत्र्य असले पाहिजे, त्यासाठी हा कट्टा निर्माण करण्यात आला आहे. मराठीतील आघाडीची सुपरकास्ट, दर्जेदार नीतीमूल्ये, नयनरम्य लोकेशन, मनाला भावणारे कथानक, उत्कंठावर्धक पटकथा, मार्मिक संवाद विषयाला अनुरूप गीतरचना आणि साजेसे संगीत अशा सर्व कारणामुळे हा चित्रपट दर्जेदार तयार झाला आहे.
या चित्रपटात विक्रम गोखले, संतोष जुवेकर, शीतल दाभोळकर, नम्रता गायकवाड, स्वाती चिटणीस अरुण नलावडे, मिलिंद शिंदे, दिलक आलेगावकर, किशोरी शहाणे, मानसी मागीकर यांनी भूमिका केल्या आहेत. कॅम्पस कट्टा ही कथा राजा नावाच्या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. ही भूमिका संतोष जुवेकर करीत आहेत. कॉलेज जीवनात विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणाऱ्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी एक लढाऊ वृत्तीचा विद्यार्थी हवा असतो आणि ही भूमिका जुवेकर यांनी केली.
या वेळी अभिनेता संतोष जुवेकर म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात भरपूर मस्ती केली. आज समाजात विद्यार्थ्यांंच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी कोणीतरी एक विद्यार्थ्यांमधील नेता हवा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देता येतो. कॅम्पस कट्टा आता बहुतेक महाविद्यालयात असून त्यात विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते. राजकारण वाईट आहे असे मला वाटत होते. मात्र, येणाऱ्या काळात संधी मिळाली तर नक्की राजकारणात जाणार आहे. कुठल्या पक्षात प्रवेश करीत हे मात्र आताच सांगत नाही. युवकांनी राजकारणात आले पाहिजे असेही जुवेकर म्हणाला. शीतल दाभोलकर आणि निर्माता महेंद्र गाढवे यावेळी उपस्थित होते.