झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका विशेष चर्चेत ठरली होती. ही मालिका अवघ्या १०० दिवसांची असली तरी त्या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले होते. या मालिकेतील प्रत्येक पात्र कायमच चर्चेत राहिले. या मालिकेत येणारी उत्कंठावर्धक वळण, गूढ रहस्य यामुळे तिला चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील बाबूराव, सायली, सतेज, रोहिणी, अभय, हणम्या या कलाकारांना चांगली प्रसिद्धी मिळाली. नुकतंच या मालिकेतील दोन कलाकारांनी साखरपुडा केला आहे.
‘ती परत आलीये’या मालिकेत रोहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी कुलकर्णी हिचा साखरपुडा पार पडला आहे. यानंतर आता लवकरच ती अभिनेता नचिकेत देवस्थळीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता नचिकेत देवस्थळी याने या मालिकेत विक्रांतची भूमिका साकारली होती.
नुकतंच तन्वीने त्या दोघांच्या साखरपुड्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तन्वीने ‘हमसफर’ असे लिहिले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक अभिनेते आणि कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान तन्वी कुलकर्णी हिने रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुरुषोत्तम करंडकसारख्या अनेक नाटकांच्या स्पर्धेत तिने काम केले आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत तन्वीने सगुणाबाईंची भूमिका साकारली होती. तर जुळता जुळता जुळतंय की, स्वराज्य जननी जिजामाता, ती परत आलीये यांसह इतर मालिकांमधून तन्वी ही प्रसिद्धीझोतात आली. अ ट्रायल बिफोर मॉन्सून या शॉर्टफिल्ममध्ये तन्वीने मोहन आगाशे यांच्यासोबत काम केले होते.
तर नचिकेत देवस्थळी हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. सुखन या लोकप्रिय कार्यक्रमाचा तो एक महत्वाचा भाग बनला आहे. नाटक कंपनीच्या सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘महानिर्वाण ‘ या नाटकातून नचिकेतने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ती परत आलीये ही नचिकेतची पहिलीच मालिका होती. यातही तो विक्रांतच्या महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाला.
या मालिकेत एकत्र काम करताना नचिकेत आणि तन्वीची मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता ते दोघे कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.