TVK Chief Thalapathy Vijay Net Worth: दाक्षिणात्या सुपरस्टार, तमिळ अभिनेता थलपती विजयने २०२४ साली ‘तमिळगा वेत्री कळघम’ पक्षाची स्थापना केली आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून तो सातत्याने जाहीर सभा, रॅलीचे आयोजन करत आहे. मात्र शनिवारी (२७ सप्टेंबर) रोजी त्याच्या करूर जिल्ह्यातील रॅलीत दुर्दैवी प्रकार घडला. अतिप्रमाणात गर्दी जमल्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ३८ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विजयने अनेक सुपरहीट सिनेमे दिले आहेत. थुप्पक्की, मर्सल, मास्टर, गोट, बिगिल, बीस्ट आणि लिओ सारख्या मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह त्याने तमिळ चित्रपट सृष्टीवर स्वतःची छाप सोडली. विजय एका चित्रटासाठी किती मानधन घेतो, त्याची उंची जीवनशैली आणि संपत्तीबाबत जाणून घेऊ.
एका चित्रपटासाठी २०० कोटी रुपयांचे मानधन
थलपती विजय केवळ तमिळ चित्रपटसृष्टीतच नाही तर भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी १०० ते १५० कोटी रुपयांचे मानधन घेत होता. मात्र अलीकडे ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’ (गोट) मधील भूमिकेसाठी थलपती विजयने २०० कोटींचे मानधन घेतल्याचे बोलले जाते. यामुळे त्याने बॉलिवूडच्या मोठमोठ्या अभिनेत्यांनाही मागे टाकले, असे सांगितले जाते. मात्र राजकारणासाठी त्याने आता चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.
समुद्रकिनारी भव्य बंगला, आलिशान गाड्यांचा संग्रह
राजकारणात येण्यापूर्वी विजय सार्वजनिक मंचावर फारसा दिसत नव्हता. चेन्नईतील नीलंकराई येथे समुद्रकिनारी त्याचा भव्य बंगला आहे. बंगल्यातील आधुनिक वास्तुकला, आसपासचा शांत परिसर यामुळे त्याच्या महालासारख्या बंगल्याचे सर्वांना कौतुक वाटते. त्याच्याकडे आलिशान गाड्यांचाही संग्रह आहे. ज्यामध्ये रोल्स-रॉइस घोस्ट, बीएमडब्ल्यू एक्स५, ऑडी ए८, मिनी कूपर आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर व्होग सारख्या गाड्या आहेत.
एकूण संपत्ती किती?
मिंटने दिलेल्या बातमीनुसार, २०२४ पर्यंत विजयची संपत्ती एकूण ६०० कोटी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. चित्रपटांमधून मिळणाऱ्या कमाईव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंटद्वारे तो १० कोटी रुपयांची कमाई करतो, असे द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले होते.

शेवटचा चित्रपट कोणता?
‘जन नायगन’ हा विजयचा त्याचा ६९ वा आणि शेवटचा चित्रपट असेल एच. विनोथ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यात अभिनेत्री पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रियामणी , नारायण आणि प्रकाश राज यांच्यासारखे कलाकार आहेत. जानेवारी २०२६ रोजी पोंगल सणानिमित्त चित्रपटाचे प्रदर्शन होईल. विशेष म्हणजे २०२६ मध्येच तमिळनाडूत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.