कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, चार मित्रांची अनोखी मैत्री, तरुणाईच्या उंबरठय़ावर पाय ठेवताना हळुवार उमलणारं प्रेम आणि अति उत्साहात एका चौकडीची उडालेली धांदल असं एकंदरीत कथासार असलेला ‘मेमरी कार्ड’ हा चित्रपट येत्या २ मार्च २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे घोषवाक्य ‘ठेवावी लागते माहिती’ ही देखील तशीच सूचकपणे मांडली आहे. बदलत्या वेळेनुसार झालेले बदल आचरणात आणताना काहीसा वेळ लागतोच. मात्र या बदलांमुळे आपल्यावर होणारे परिणाम या सिनेमात हसत खेळत मांडलेत.
स्मार्ट फोन वापरण्यासाठी स्मार्टनेस असावा लागतो आणि तो नसला की होणारी पंचाईत सिनेमात दाखवली आहे. मात्र आपल्या माणसांच्या संपर्कात राहण्यासाठी फोनची गरज असतेच असं नाही हेही ‘मेमरी कार्ड’ मध्ये अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संगीत प्रितेश कामत —मितेश चिंदरकर या जोडगोळीने केले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात दाखल झालेल्या प्रितेश—मितेश यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाची कथा मनाली काळे आणि श्याम सामंत यांनी लिहिली आहे. अभिनेता संजय खापरे आणि सुनील तावडे यांना देखील सिनेमात पाहण्याचा योग ‘मेमरी कार्ड’च्या निमित्ताने येणार आहे. त्याचबरोबर रिषभ पुरोहित, विभूती कदम, अपूर्वा परांजपे, प्रणाली चव्हाण, आदित्य नाकती, कुणाल शिंदे, हितेश कल्याणकर, दिनेश पाटील, कल्पना बांदेकर, विजय चव्हाण, अक्षता कांबळी या नवोदित कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
साध्या गोष्टीवर बेतलेल्या या सिनेमात अशा अनेक व्यक्तिरेखा आहेत ज्या आपण सहज आपल्या आयुष्याशी जोडू शकतो. कोकणातील एका लहान गावात दहावीपर्यंत शिकलेला मुलगा कॉलेजसाठी मोठय़ा शहरात आल्यावर त्याची होणारी चलबिचल तर दुसरीकडे अजिबात ओळख नसताना एखादी मुलगी नव्याने शहरात आलेल्या आपल्या मित्राला किती सहज मनमोकळं व्हायला मदत करते अशा अनेक गोष्टी सिनेमाची रंगत वाढवतात. मुळात कथा या सिनेमाचा हिरो आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.