‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा आणखी एक अध्याय म्हणजेच ‘चॅप्टर ३’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आयुषमान खुराना आणि परिणीती चोप्रा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने सध्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. ‘कलकत्ते की मिस मडोना’ या नावाने ‘मेरी प्यारी बिंदू..’ या चित्रपटाचा ‘चॅप्टर ३’ प्रदर्शित करण्यात आला आहे. परिणीती आणि आयुषमानचा दिलखुलास अंदाज आणि त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चांगलीच जमून, आल्याचे या चॅप्टरमधून पाहायला मिळते आहे.

संगीत हा या चित्रपटाचा गाभा असल्यामुळे प्रत्येक ट्रेलरमध्ये रेट्रो म्युझिक महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळते आहे. रेट्रो लूक, त्या काळच्या डिस्को गाण्याच्या पार्श्वसंगीतामध्ये बिंदू आणि अभिमन्यूची पुढे सरकणारी कथा या साऱ्याची झलक ‘कलकत्ता की मिस मडोना’ या चॅप्टरमध्ये पाहायला मिळते आहे. वहिदा रेहमान आणि लता मंगेशकर यांचा त्या काळच्या तरुणाईवर असणारा प्रभाव आणि त्याप्रमाणेच असणारी तरुणाईची स्वप्न याची सांगड या ‘चॅप्टर ३’मध्ये घालण्यात आली आहे.

यशराज फिल्म्सचा हा ‘मेरी प्यारी बिंदू’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, १२ मे २०१७ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय रॉय दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान आणि परिणीती पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे बी-टाऊनला एक नवी ऑनस्क्रिन जोडी मिळाली आहे. त्यामुळे आता बिंदू आणि अभिमन्यूची ही जोडी प्रेक्षकांना भावते का, हे येत्या काळात कळेलच.

दरम्यान, परिणीती ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटामागोमाग ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटावरही लक्ष केंद्रित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल ४’ या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा, तब्बू, तुषार कपूर, अर्शद वारसी, अजय देवगण हे कलाकार झळकणार आहेत.