अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागील कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर करण जोहर, महेश भट्ट अशा दिग्गजांवर अनेक आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच महेश भट्टमुळे सुशांत आणि त्याची रिया चक्रवर्ती यांच्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात असून महेश भट्टने रियाला सुशांतपासून दूर राहण्यास सांगितलं होतं, अशी चर्चा आहे. परंतु, महेश भट्ट यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘एएनआय’च्या वृत्तात असं नमूद करण्यात आलं आहे.

पोलीस चौकशीदरम्यान, महेश भट्ट यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात रिया आणि सुशांतच्या नात्याविषयीदेखील त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. याची उत्तर देत असताना मी रियाला सुशांतपासून कधीच वेगळं राहण्यास सांगितलं नाही, असं ते म्हणाले.

“नोव्हेंबर २०१८ ते २०१९ या काळात मी केवळ दोन वेळा सुशांतला भेटलो. पहिल्यांदा एका कार्यक्रमात आणि दुसऱ्यांदा जेव्हा रिया चक्रवर्तीला मी ‘जलेबी’ चित्रपटात घेतलं होतं तेव्हा.मी कधीच रियाला सुशांतपासून दूर राहण्यास किंवा त्याला सोडून देण्यास सांगितलं नव्हतं”, असं महेश भट्ट म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणतात, ‘सडक 2साठी मी कधीच सुशांतच्या नावाचा विचार केला नव्हता. कारण या चित्रपटासाठी मी आधीपासूनच संजय दत्तच्या नावाचा विचार केला होता.संजय चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल हे मी फार आधी ठरवलं होतं.”

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. सध्या या घटनेला वेगळं वळण लागलं असून रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण कलाविश्वातील चर्चेचा विषय ठरत आहे.