गेल्या काही दिवसांपासून लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दिग्दर्शक विकास बहलला आणखी एक दणका मिळाला आहे. इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डिरेक्टर असोसिएशनने (IFTDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विकास वर काही दिवसापूर्वी एका महिलेने लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनेही विकासवर आरोप केल्याचं दिसून आलं. याप्रकारानंतर विकासला IFTDA ने नोटीस बजावत एका आठवड्याच्या आता उत्तर देण्यास सांगितलं होतं. यावर विकासने नुकतंच त्याचं उत्तर दिलं आहे.

‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. यामध्ये कोणतेच तथ्य नाही. हे आरोप म्हणजे माझ्याविरुद्ध रचण्यात आलेला कट आहे. त्यामुळे माझं सदस्यत्व रद्द करु नका’, असं विकासने त्याच्या उत्तरात म्हटलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला, ‘आतापर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. फॅन्टम कंपनीतील सहसंस्थापक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य यांनी माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी सोशल मीडियावर माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. खरं पाहता हे सारे आरोप खोटे असून वैयक्तिक वादामुळेच ते असं करत आहेत’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विकास बहलवर फॅन्टम कंपनीतील एका महिलने लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. महिलेच्या या आरोपानंतर अभिनेत्री कंगना रणौतनेही या महिलेला पाठिंबा देत विकासविरुद्ध आवाज उठविला होता. इतकंच नाही तर या आरोपांनंतर अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानी या दोघांनी ‘फॅण्टम फिल्म्स’मधून काढता पाय घेतला होता. परंतु विकासने त्याच्यावर करण्यात आलेले सारे आरोप फेटाळून लावले आहेत.