Milind Soman Mother Skipping Every Day At Age Of 86 : मिलिंद सोमणला ५९ वर्षे पूर्ण झाली असून, तो या वयातही आपल्या फिटनेस आणि एनर्जीने तरुणांना हरवत आहे. जबरदस्त फिटनेस, अशी ओळख असलेला अभिनेता मिलिंद सोमण कायम चर्चेत असतो. कधी तो पुशअप्स करताना दिसतो, तर कधी तो मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतो. त्याच्या फिटनेसला तोडच नाहीये.

पण, आज आम्ही मॉडेल व अभिनेता मिलिंद याच्याबद्दल बोलत नसून, त्याच्या आईबद्दल बोलत आहोत. उषा सोमण ८६ वर्षांच्या वयातही खूपच तंदुरुस्त आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षीही त्या चक्क दोरीच्या उड्या मारत आहेत आणि त्याचीच झलक मिलिंदने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दाखवली आहे.

मिलिंदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही क्षणांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याच्या आईचे कौतुक करत आहेत.

मिलिंद सोमणची आई उषा सोमण यांनी आता ८५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचे याआधीही अनेक व्हिडीओ व्हायरल झाते, ज्यात त्या त्यांच्या मुलाबरोबर मॅरेथॉन पळताना दिसल्या आहेत. उषा सोमण या वयातही चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. मिलिंद सोमणने आईचा दोरीच्या उड्या मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शनदेखील दिली आहे. त्याने लिहिले, “फॅमिली स्किपिंग टाइम. आई आता ८६ वर्षांची आहे. तिच्या दररोजच्या अॅक्टिव्हिटीमध्ये योगासोबतच दोरीच्या उड्या मारणं हेही आहे. सगळ्यांनाच, निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो.”

या व्हिडीओमध्ये त्यांची सून अंकिताही दिसत आहे. त्या सुनेबरोबरही दोरीवरच्या उड्या मारण्याचा आनंद घेत आहेत. या वयातही त्यांचा फिटनेस अगदी विशीतल्या तरुणालाही लाजवणारा आहे. मिलिंदने आईच्या फिटनेस फंड्याचा व्हिडीओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांचे अनेक व्हिडीओ मिलिंदने शेअर केले आहेत.

2018 मध्ये मिलिंद सोमणने २६ वर्षीय लहान तरुणीबरोबर लग्न केले. मिलिंद सोमण याच्या बायकोचे नाव अंकिता कोंवर असे आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अंकिता हिची आईदेखील मिलिंद सोमण याच्यापेक्षा लहान आहे. त्याच कारणामुळे मिलिंद याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.