बॉलीवूडमध्ये सर्वाधिक बोलबाला होतो तो स्टार कलावंतांच्या मुलामुलींचा. कारण लहानपणापासून ते स्टारडम असलेल्या आई-वडिलांच्या सान्निध्यात वाढतात, वावरतात. त्या अनुषंगाने आपोआपच स्टार कलावंतांच्या मुलामुलींना शाळकरी वयात असतानाच ‘स्टारडम’ मिळते. शाळेत, कोणत्याही बिगरबॉलीवूड कार्यक्रमात, मित्रमैत्रिणींमध्ये हा अमूकतमूक हिरोचा मुलगा किंवा ती अमूक हिरोईनची मुलगी अशाच दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जाते.
हिरोईनला मूल झाले, स्टार कलावंत जोडप्यांची लग्ने झाली की त्याचीही माध्यमांकडून मोठय़ा प्रमाणात दखल घेतली जाते. त्याचप्रमाणे स्टार कलावंतांची मुलेमुली रूपेरी पडद्यावर पदार्पण करतात तेव्हाही त्यांचा प्रचंड गाजावाजा केला जातो. ‘फिल्म फॅमिली’ ही संकल्पना आपल्याकडे रूजली ती प्रामुख्याने ‘कपूर खानदान’मुळे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर ते करिना कपूर आणि आता सध्या बॉलीवूडच्या नंबर वन हिरोपदाच्या जवळ जाणाऱ्या रणबीर कपूपर्यंत ही परंपरा चालत आली आहे.  मुख्यत्वे या स्टार कलावंतांच्या परंपरेला ‘ग्लॅमर’ लाभले असल्याने आपल्याला ते लवकर ज्ञात होतात. पण, कलाकारांच्या मुलांपाठोपाठ  बॉलिवुडमध्ये भारतीय लष्करात मोठय़ामोठय़ा पदांवर कार्यरत राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलींची संख्याही विलक्षण आहे. या अधिकाऱ्यांच्या मुलींचीही ए क बॉलिवुड आर्मी आहे.
या आर्मीत सुष्मिता सेन, प्रीती झिंटा, अनुष्का शर्मा, चित्रांगदा सिंग, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता यांची नावे घेता येतील. परिणीती आणि मीरा या प्रियांका चोप्राच्या बहिणीही आता बॉलीवूडमध्ये आल्या आहेत. परंतु, प्रियांका चोप्राने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर नंबर वन हिरोईन बनण्यापर्यंत झेप घेतली. बॉलीवूडची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना प्रियांकाने मिळविलेले यश वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल. प्रियांकाचे आई-वडील डॉ. अशोक चोप्रा आणि डॉ. मधु अखौरी हे दोघेही भारतीय लष्करात फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. अभिनेत्री आणि दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करणारी पालक म्हणून सुष्मिता सेन सगळ्यांना माहीत आहे.
तिचे वडील सुबेर सेन हे भारतीय हवाई दलाचे माजी विंग कमांडर आहेत. प्रीती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा हेही भारतीय लष्कराचे अधिकारी होते. तिचा भाऊ दीपांकर हाही आता भारतीय लष्करात आहे. आपला अभिनय आणि लूकमुळे ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’द्वारे पदार्पण करून हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट करूनही लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिचे वडील कर्नल निरंजन सिंग हेही भारतीय लष्करातले आहेत.
 अभिनेत्री नेहा धुपिया हिचे वडील कमांडर प्रदीप सिंग धुपिया हे भारतीय नौदलाच्या सेवेत होते. नौदलातील अधिकाऱ्याची मुलगी म्हणून जे वातावरण मिळाले त्यामुळेच आत्मविश्वास वाढला आणि आपण मिस इंडिया किताब जिंकण्यापर्यंत मजल मारू शकलो असे नेहाचे मत आहे.
सध्याची बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे वडील अजय कुमार शर्मा हेही भारतीय लष्करात मेजर म्हणून कार्यरत होते. लारा दत्ता हिचे वडील एल के दत्ता हे भारतीय हवाईदलात होते. तर तिची बहिणही भारतीय हवाईदलाच्या सेवेत आहे. एअर फोर्स क्लब्समध्ये जाऊन जलतरण तसेच लोकांसमोर जाहीरपणे कसे बोलायचे याचे शिक्षण मिळाले म्हणूनच आपण मिस युनिव्हर्ससारखा किताब जिंकण्यापर्यंत मजल मारू शकलो असे लारा दत्ताचे म्हणणे आहे.
भारतीय संरक्षण दलातील शिस्त, वेगवेगळ्या ठिकाणी आई-वडिलांच्या बदल्या होत गेल्याने देशातील वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती, वातावरण याची सवय या अभिनेत्रींना झाली. त्याचबरोबर जागतिक सौंदर्य स्पर्धामध्ये यश मिळवण्यापासून ते बॉलीवूडची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना बॉलीवूडमध्ये पदार्पण करून आपली स्वत:ची मोहोर उमटविण्याचे कौशल्य या अभिनेत्री दाखवू शकल्या याचे श्रेय त्या लष्करी शिस्तीतील आपल्या आई-वडिलांनाच देतात.