जगभरात समलिंगी व्यक्तींचे भावविश्व, त्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अनेक चित्रपट महोत्सव भरविले जातात. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतही ‘कशिश’ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये समलिंगी व्यक्तींच्या जीवनावरील चित्रपट दाखविले जातात. यंदा हा महोत्सव २१ ते २५ मे दरम्यान होणार आहे. ‘बायोस्कोप’ हा चार दिग्दर्शकांनी बनविलेल्या चार वेगवेगळ्या लघुपटांपैकी ‘मित्रा’ हा रवी जाधव दिग्दर्शित लघुपट समलिंगी संबंधांवरचा असल्याने या लघुपटाची निवड ‘कशिश’ चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात करण्यात आली आहे. मराठीमध्ये समलिंगी संबंधांवर बनविलेला हा पहिला चित्रपट असून ‘कशिश’ महोत्सवात या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमिअर खेळ होणार आहे. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्रा’ या लघुकथेला रवी जाधव यांनी रूपेरी पडद्यावर आणले आहे. संदीप खरे यांची कविता आणि तेंडुलकरांची कथा याची सांगड घालून कथेतील १९४७ चा कालावधी दाखविण्यासाठी संपूर्ण लघुपट कृष्णधवल चित्रीत करण्याचा आगळावेगळा प्रयोगही रवी जाधव यांनी केला आहे. वासुदेव राणे यांचे छायालेखन असलेल्या या लघुपटात वीणा जामकर, मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कवी संदीप खरे प्रथमच रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
‘कशिश’ महोत्सवात ‘बायोस्कोप’मधील ‘मित्रा’
जगभरात समलिंगी व्यक्तींचे भावविश्व, त्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अनेक चित्रपट महोत्सव भरविले जातात.
First published on: 13-04-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitra from bioscope selected in kashish queer international festival