Mohanlal To Get Dadasaheb Phalke Award 2023 : मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ ने सन्मानित केलं जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील आजवरच्या योगदानासाठी मोहनलाल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे मोहनलाल दुसरे मल्याळी कलाकार आहेत. त्यांच्याआधी अदूर गोपालकृष्णन यांना २००४ साली हा पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, या पुरस्कारासाठी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोहनलाल यांच्याआधी ज्येष्ठ बॉलिवूड व बंगाली अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार मिळाला होता. २०२२ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथून यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ६५ वर्षीय मोहनलाल हे गेल्या ४५ वर्षांपासून मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. १९८० साली त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना याआधी पद्मश्री व पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कधी मिळणार याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट करून माहिती शेअर केली आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की “दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने केलेल्या शिफारसीवर घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे की मोहनलाल यांना प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ प्रदान केला जाणार आहे.

पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनलाल यांना शुभेच्छा देणारी एक पोस्ट एक्सवर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मोहनलालजी हे उत्कृष्ट व अष्टपैलू अभिनयाचं प्रतीक आहेत. त्यांनी गेली अनेक दशकं विविध क्षेत्रात योगदान दिलं आहे. प्रामुख्याने मल्याळम चित्रपटसृष्टी, नाटक आणि केरळचा सांस्कृतिक वारसा जपण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांनी मल्याळमसह तेलुगू, तमिळ, कन्नड व हिंदी चित्रपटांध्ये देखील उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट व नाटक क्षेत्रातीत त्यांची प्रतिभा व समर्पण खूप प्रेरणादायक आहे. ते दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होत आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यांच्या कामातून पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहो.