प्रसिद्ध टीव्ही अभिनेता मोहित रैना काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत मोहितनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्याची पत्नी सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती. अदिती कोण आहे? अभिनय क्षेत्राशी संबंधित आहे का? याबाबत अनेकांनी इंटरनेटवर सर्चही केलं. पण कोणालाच तिची फारशी काही माहिती मिळाली नाही. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोहितनं अदिती आणि त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगत त्यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासाही केला आहे.
मोहित रैनाच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो बरेच चर्चेत होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मोहित रैना त्याच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच बोलला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मोहित म्हणाला, ‘हे लग्न अगोदरपासून प्लान करून झालेलं नाही. अचानक आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न झालं. त्यामुळे आमच्या लग्नात केवळ दोघांचे नातेवाईक उपस्थित होते.’ मोहित आणि अदितीचा विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता.
मोहित पुढे म्हणाला, ‘मी जेव्हा लग्नाची घोषणा केली तेव्हा मला वाटलं नव्हतं मला एवढं प्रेम मिळेल. याची अपेक्षाच नव्हती. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. मी नेहमीच माझं खासगी आयुष्य जाहीरपणे कोणासमोर मांडणं टाळतो. हे लग्न माझ्या स्वप्नवत होतं. मी या सर्व गोष्टींचं शब्दात वर्णन करू शकत नाही.’
या मुलाखतीत मोहित रैनानं तो अदितीला कसा भेटला याचा किस्साही सांगितला. तो म्हणाला, ‘आम्ही दोघं काही वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि आमची मैत्री पुढे नेण्याचा विचार केला होता. करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मी तिला मागणी घालण्यासाठी तिच्या घरी गेलो. तिच्या कुटुंबीयांना भेटलो. त्यानंतर आमचे दोघांचेही कुटुंबीय भेटले आणि मग अचानक लग्नाचा निर्णय झाला.’