अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. दरम्यान, तिचे नाव धनुषशी जोडले जात होते, ज्याला तिने नकार दिला आहे.
आता तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बिपाशा बासूबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. या जुन्या व्हिडीओमध्ये मृणाल स्वतःला बिपाशा बासूपेक्षा चांगली असल्याचे सांगते. हा व्हिडीओ त्या वेळचा आहे जेव्हा ती ‘कुमकुम भाग्य’ हा शो करत होती.
मृणाल ठाकूरने बिपाशा बासूबद्दल काय म्हटले होते?
व्हायरल व वादग्रस्त क्लिप तिच्या ‘कुमकुम भाग्य’च्या दिवसातील आहे. मृणाल ही तिचा सहकलाकार अरिजित तनेजाबरोबर एका मुलाखतीदरम्यान फिटनेसबद्दल बोलत होती. त्याला त्याच्या शारीरिक आवडी-निवडींबद्दल विचारण्यात आले. “तू अशा स्त्रीशी लग्न करशील का, जिच्यात पुरुषांसारखे स्नायू आहेत.” त्यावर मृणाल त्याला म्हणाली, “जा बिपाशाशी जाऊन लग्न कर. मी बिपाशापेक्षा खूप चांगली आहे.” अनेकांनी याला दुसऱ्या अभिनेत्रीची अनावश्यक खिल्ली उडवणे म्हटले आहे.
बिपाशाने त्यावर तेव्हाही काहीही प्रतिसाद दिला नव्हता आणि आताही दिला नाही. बिपाशाने रंग बदलण्यासाठी कोणतीही सर्जरी न करता त्वचा जशी आहे, तशीच राहू दिली. या गोष्टीसाठी अनेकांना बिपाशाचे कौतुक वाटते. बिपाशानं सांगितल्याप्रमाणे तिला अनेकदा रंगामुळे नाकारले गेले आहे.
मृणालच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर अनेक वर्षे टीव्हीवर काम केल्यानंतर तिने २०१८ मध्ये ‘लव्ह सोनिया’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘सुपर ३०’, ‘बाटला हाऊस’, ‘घोस्ट स्टोरीज’, ‘तूफान’, ‘धमाका’, ‘जर्सी’, ‘लस्ट स्टोरीज २’, ‘सन ऑफ सरदार २’मध्ये काम केले आहे. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर आता ती ‘डकैत अ लव स्टोरी’, ‘है जवानी तो इश्क होना है’ व ‘पूजा मेरी जान’मध्ये दिसणार आहे. बऱ्याचदा एकत्र दिसल्यानंतर मृणाल आणि धनुष डेटिंग करीत असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या; पण अभिनेत्रीने ते नाकारले आणि म्हणाली की, ते फक्त मित्र आहेत.