‘कबीर सिंह’ सारखा हिट चित्रपट देणारा अभिनेता शाहिद कपूर लवकरच जर्सी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून शाहिदच्या या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात शाहिदसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या मृणाल आणि शाहिद ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान एका इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये मृणालनं चित्रपटाच्या सेटवर शाहिदच्या कानशिलात लगावल्याचा किस्सा शेअर केला.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये मृणाल ठाकूर शाहिद कपूरच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. याच सीनचा किस्सा मृणालनं तिच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये शेअर केला. हा सीन कसा शूट करण्यात आला आणि त्यावेळी तिची काय अवस्था झाली होती हेही तिनं यावेळी सांगितलं.

शाहिदच्या कानशिलात लगावण्याच्या सीनबाबत बोलताना मृणाल म्हणाली, ‘या सीनच्या वेळी मी खूप घाबरले होते. मला शाहिदचा परफॉर्मन्स बिघडवायचा नव्हता. त्याला जोरात लागलं तर काय होईल अशी भीती मला वाटत होती. पण यावेळी शाहिदनंच मला खूप मदत केली. तो सातत्यानं मला सांगत होता की, तू मला मार. या सीनमुळे सर्वजण हैराण झाले आहे. आता मला माहीत नाही की यावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया असतील.’

‘जर्सी’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतच पंकज कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी या चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. शाहिद हा पंकज कपूर यांचा मुलगा आहे. मात्र या दोघांनी बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर एकत्र काम केलेलं नाही.