मुंबई सिव्हिल कोर्टाने प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ या गेमवर तात्पुरती बंदी घातली आहे. तरुणांमध्ये नुकताच चर्चेच आलेला हा गेम सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन तसचं काळवीट प्रकरणावरून तयार करण्यात आला आहे. त्यामुळेच सलमान खानने या गेम विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

सलमान खानचे चाहते त्याला सलमान भाई म्हणतात आणि या गेमचं नाव देखील काहीस साधर्म्य असणारं असल्याने सलमानची प्रतिष्ठा मलीन होत असल्याचा आरोप सलमानने न्यायालयात केलाय. सलमान खानच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायाधीश केएम जयस्वाल यांनी या गेमवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

हे देखील वाचा: ‘या’ अभिनेत्याच्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, तैमूरपेक्षाही क्यूट दिसत असल्याच्या नेटकऱ्यांच्या चर्चा

या गेमची रचना आणि त्यातील अनेक गोष्टी या सलमान खानशी संबधीत असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. शिवाय हा गेम बनवणाऱ्या कंपनीने सलमान खानची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने या गेमची निर्मिती करणारी कंपनी पॅरोडी स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडला गुगुल प्ले स्टोर आणि इतर प्लॅटफॉर्मवरून हा गेम त्वरित काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबत या गेममध्ये आवश्यक ते बदल करूनच हा गेम पुन्हा लॉन्च करावा असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

हा गेम काल्पनिक असल्याचा दावा गेमिंग कंपनीने केला आहे. मात्र या खेळातील प्लेअर ‘सेलमोन भोई’ला सुरुवातीला दारुच्या नशेत गाडी चालवताना दाखवण्यात आलंय. तसचं या गेममधीन अ‍ॅनिमेटेड पात्र हे सलमान खान सारखचं दिसणारं आहे. त्यामुळे केवळ व्यावसायिक फायद्यासाठी कंपनीने बॉलिवूड अभिनेत्याचा उपयोग केल्याचा आरोप न्यायालयाने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर होणार आहे.