अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीकडून त्याला अटकही करण्यात आली आहे. आर्यन खानने तो या पार्टीचा भाग असल्याची कबुलीही दिली आहे.
आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीच्या कार्यालयात त्याची कसून चौकशी करण्यात आली. आर्यनसोबत इतर सात जणांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. आर्यन खानसोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबी चौकशी करत आहे. या क्रूझवर लपवून ड्रग्स नेण्यात आल्याची माहितीही नुकतीच समोर आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आर्यन खानला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
अनेक नेटकऱ्यांनी त्याचे काही मिम्स, फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर आर्यन खानसोबतच शाहरुख खानलाही नेटकऱ्यांच्या ट्रोलचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनाही ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.
आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर #BoycottBollywood, #ShahRukhKhan, #AryanKhan, #raveparty, #DrugsParty, #SRK_का_बेटा_नशेड़ी असे विविध हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.