अजान मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे गायक सोनू निगम पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार सोनूच्या जीवाला धोका असून, त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणांनी मुंबई पोलिसांना सोनूच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली. सोनू काही कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर असून, त्याच्या जीवाला धोका असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी, कॉन्सर्टमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेला असता त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता यातून वर्तवण्यात आली आहे.
वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर सोनूची सुरक्षा वाढवली आहे. इतकच नव्हे, तर सध्याच्या घडीला त्याला योग्य ती सुरक्षा व्यवस्था देऊन त्याच्या जीवाला कोणताही धोका पोहोचू न देणं यालाच सुरक्षा यंत्रणांनी प्राधान्य दिल्याचं कळत आहे. गेल्या वर्षी सोनू निगमने ट्विटरच्या माध्यमातून अजानविषयीचं ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्याच्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळापासून ते अगदी कलाविश्वातही अनेकांनी मतप्रदर्शन करत या मुद्द्यावर आपल्या भूमिका मांडल्या होत्या. या साऱ्यामध्ये मुस्लिम धर्मियांनी सोनूला धारेवर धरत त्याला खडे बोलही सुनावले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.