सर्वांनाच माहीत आहे की, मुमताज यांनी त्यांच्या अद्भुत चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली. ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज सध्या त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीबद्दल खूप काही सांगितले आहे.
आता अलीकडेच मुमताज यांनी सांगितले आहे की, त्या चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यास तयार आहेत; पण त्या आईची भूमिका साकारणार नाहीत. त्या वृद्ध महिलेचीही भूमिका साकारण्यास तयार नाहीत.
अलीकडेच एका कार्यक्रमात, पापाराझींनी त्यांना एक प्रश्न विचारला, ज्याचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केला आहे. त्यांना विचारण्यात आले की, चाहत्यांना तुम्हाला चित्रपटांमध्ये बघायचं आहे. मग ही आनंदाची बातमी कधी देणार आहात?
“वृद्ध महिलेची भूमिका करणार नाही…”
या प्रश्नावर मुमताज म्हणाल्या, “मी सध्याच्या चित्रपटांमध्ये वृद्ध महिलेची भूमिका करणार नाही, मला शोभेल अशी भूमिका ऑफर केली गेलेली नाही. मला एखादी भूमिका मिळाल्यावर मी त्याबद्दल विचार करेन.” त्यांना विचारण्यात आले की, त्यांना ऑफर येत आहेत का? त्यावर अभिनेत्री म्हणाली, “मला हव्या तशा ऑफर्स मिळत नाहीत. मी कोणाच्या आईची भूमिका करणार नाही.”
सर्वांत यशस्वी व सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मुमताज यांनी ६० व ७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. राजेश खन्ना, धर्मेंद्र व दारा सिंग यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करून, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.
मुमताज शेवटच्या १९९० मध्ये आलेल्या ‘आंधियाँ’ चित्रपटात दिसल्या होत्या. त्यानंतर २०१० मध्ये त्या ‘१ अ मिनिट’ या डॉक्युमेंट्रीमध्ये दिसल्या. त्याशिवाय त्यांनी १९५८ मध्ये ‘सोने की चिडियाँ’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये कामे केली आणि त्यांना दोन फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मुमताज यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फिल्म मेकर मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं. मुमताज यांच्या मोठ्या मुलीचं नाव नताशा माधवानी तर, दुसऱ्या मुलीचं नाव तान्या माधवानी असं आहे.