सध्या मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत आणि या नाटकांना प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘टेलीव्हिजन’वर लोकप्रिय झालेले अनेक कलाकार सध्या रंगभूमी गाजवत असल्याचे पहायला मिळत आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे कलाकार नाटकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचं नाटक. या शोमधील काही कलाकार एकाच नाटकात आणि हे नाटक म्हणजे ‘थेट तुमच्या घरातून’. या नाटकात नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर आणि प्रसाद खांडेकर ही मंडळी दिसत आहेत. तर त्यांच्याबरोबर भक्ती देसाई ही अभिनेत्रीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा विषय हा दोन पिढ्यांमधील संवादाच्या अंतराबद्दल आहे. अनेक प्रेक्षकांना या नाटकाचा विषय हा त्यांच्या घरातलाच वाटतो. त्यामुळे या नाटकाबद्दल प्रेक्षक भरभरून व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच नम्रता संभेरावने तिचं ‘थेट आमच्या घरातून’ हे नाटक बघताना एका अंध महिलेला अश्रू अनावर झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत नम्रता असं म्हणते, “यांनी नाटक पाहिलं म्हणण्यापेक्षा नाटक अनुभवलं खऱ्या अर्थाने. एक नाट्यकलाकार म्हणून भरून पावले. विष्णुदास भावे नाट्यगृह इथल्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाला खास रसिक प्रेक्षक आले होते. मी हा व्हिडीओ आणि हा क्षण साठवून ठेवणार आहे. ही प्रतिक्रिया, दाद म्हणजे कामाची पावती आहे. नाटकासाठीची, मनोरंजनासाठीची केलेली धडपड आज फळाला आली.”
यापुढे नम्रता म्हणते, “आमच्या नाटकात शेवटी माझ्या तोंडी म्हणजेच एका आईच्या मनातली तिच्या मुलांविषयी आणि नवऱ्याविषयी असणारी भावना मांडणारं एक संदेशपर स्वगत आहे. जो नाटकाचा विषय आहे. ज्यात कुटुंबातील दोन पिढ्यांमधील संवादाच्या अंतराबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. प्रसादने हे इतकं उत्तम लिहिलं आहे की, प्रत्येकाला ही गोष्ट आपल्या घरातली वाटेल.”
यानंतर नम्रताने “म्हणून आम्ही कलाकार म्हणतो नाटक श्वास आहे. कलाकार म्हणून जगायला त्याची नितांत गरज आहे. नाटक जपुया जगवूया आणि प्रयोग करत राहुया” असं म्हटलं आहे. प्रसाद खांडेकरनेदेखील हा व्हिडीओ शेअर करत “याचसाठी केला होता अट्टाहास” असं म्हटलं आहे. दरम्यान, या व्हिडीओखाली चाहत्यांनी कमेंट्समध्ये कलाकारांचं आणि नाटकाचंही कौतुक केलं आहे.