Kishore Kumar Was Asked To Bribe A Minister To Win National Award : १ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. चित्रपटसृष्टीतील तीन दशकांच्या कारकिर्दीनंतर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दोन्ही दिग्गज अभिनेत्यांनी त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकून एक नवा विक्रम केला, परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांना अनेक वर्षे योगदान देऊनही कधीही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही.
राष्ट्रीय पुरस्कार न जिंकणाऱ्यांच्या यादीत किशोर कुमार, धर्मेंद्र, मधुबाला, राजेश खन्ना, देव आनंद, मीना कुमारी अशी अनेक नावं आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किशोर कुमार राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते, परंतु एका अटीमुळे गायकाची संपूर्ण योजना बिघडली.
विकी लालवानीशी बोलताना, किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारने त्याच्या वडिलांना राष्ट्रीय पुरस्काराची ऑफर देण्यात आली होती त्याबद्दल सांगितले होते. परंतु, एका अटीमुळे त्यांचा संपूर्ण खेळ खराब झाला. किशोर कुमार यांच्या मुलाने सांगितले की, गायक ‘दूर गगन की छओं में’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या जवळ होते. त्यांनी त्यांचा मुलगा अमित कुमार यांच्याबरोबर ‘दूर गगन की छओं में’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात ते खूप गंभीर भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटातील किशोर कुमार यांची भूमिका खूप आवडली आणि चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकनही मिळणार होते, परंतु चित्रपटाला पुरस्कार मिळू शकला नाही, कारण किशोर कुमार यांनी पुरस्कारासाठी लाच देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी लाच देऊन कोणताही पुरस्कार खरेदी करणार नाही हे स्पष्टपणे सांगितले होते.
मंत्रालयातून का फोन आला होता?
अमित म्हणाले, “माझ्या वडिलांना दिल्लीतील मंत्रालयातून फोन आला. त्यावेळी ‘दोस्ती’, ‘हकीकत’, ‘दूर गगन की छओं में’ हे चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत होते. मंत्रालयातील कोणीतरी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की, जर तुम्ही माझ्यासाठी काही केले तर आम्ही तुम्हाला पुरस्कारासाठी नामांकित करू शकतो. माझे वडील म्हणाले, तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे? माझा चित्रपट हिट झाला आहे.”
अमित म्हणाले की, किशोर कुमार यांचा हा चित्रपट २३ आठवडे थिएटरमध्ये चालला होता आणि दिल्ली-यूपीमध्ये हा चित्रपट २५ आठवडे थिएटरमधून बाहेर पडला नाही. ‘दूर गगन की छओं में’ बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.