Navya Nair on 1.14 lakh fine for jasmine flowers in Australia: मल्याळम अभिनेत्री नव्या नायर नुकतीच ऑस्ट्रेलियाला मल्याळी असोसिएशन ऑफ व्हिक्टोरियाने आयोजित केलेल्या ओणमच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने केसात चमेलीचा गजरा माळला होता. भारतात ही गोष्ट सामान्य असली तरी इतर काही देशांत मात्र ही बाब सामान्य नाही.
गजऱ्यामुळे झाली भारतीय अभिनेत्रीवर कारवाई
अभिनेत्रीने एका सार्वजनिक कार्यक्रमात याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “मी तेथे पोहोचण्यापूर्वी, माझ्या वडिलांनी माझ्यासाठी चमेलीचा गजरा विकत घेतला. त्यांनी तो दोन भागांमध्ये कापून मला दिला. त्यांनी मला कोचीहून सिंगापूरला जाताना केसात एक घालण्यास सांगितले. कारण- मी पोहोचेपर्यंत ती फुले कोमेजून गेली असती आणि गजऱ्याचा दुसरा भाग माझ्या बॅगमध्ये ठेवण्यास सांगितले, जेणेकरून मी सिंगापूरहून पुढील प्रवासात तो घालू शकेन. तो गजरा मी माझ्या बॅगमध्ये ठेवला होता.”
“मी जे केले, ते कायद्याच्या विरुद्ध होते. माझ्याकडून नकळत चूक झाली. १५ सेंमी चमेलीचा गजरा आणल्याबद्दल अधिकाऱ्यांनी मला १,९८० ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच १.१४ लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मी ती चूक जाणूनबुजून केली नाही; पण चूक ही चूक असते. २८ दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे मला तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले”, असे म्हणत अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला.
नव्या नायर काय म्हणाली?
नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी अभिनेत्रीने संवाद साधला. ती म्हणाली, “जेव्हा मला दंड सांगितला तेव्हा मला धक्का बसला होता. कारण- ती रक्कम खूप मोठी आहे. ज्यावेळी मी ऑस्ट्रेलियात पोहोचले तेव्हा गजरा माझ्या बॅगेत नव्हता. मी तो गजरा लपवला नव्हता. त्यावेळी गजरा केसात घातला होता. फक्त माझ्याकडून ही चूक झाली की, तिथे चमेलीची फुले घेऊन जाण्यास मनाई आहे, हे माझ्या लक्षात आले नाही. तेथील श्वानांना माझ्या बॅगचा वास आला. कारण- आधी मी गजरा बॅगेत ठेवला होता. “
दंड माफ करण्यासाठी अधिकाऱ्यांशी मी मेलद्वारे संपर्क साधला असल्याचे सांगत अभिनेत्री म्हणाली, “माझ्याकडे पैसे भरण्यासाठी २८ दिवसांचा वेळ आहे. त्यांनी मला असेही सांगितले की,मी कृषी विभागाला या सर्व तपशिलांसह एक मेल पाठवू शकते. म्हणून मी त्यांना त्याच रात्री एक मेल पाठवला. मी फक्त उत्तराची वाट पाहत आहे. मी त्यांना दंड माफ करण्यास सांगितले आहे. मी अनेक लेखांमध्ये वाचले आहे की, ते ३०० डॉलर्स दंड आकारतात; पण मला त्यांनी १९८० डॉलर्स इतका दंड आकारला होता. मला या देशातील नियम माहीत नसल्याने मला त्याबाबत फार काही माहीत नाही.”
अभिनेत्री असेही म्हणाली, “हे या देशातील कायदे आहेत आणि मला त्यांचे पालन करावेच लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की, मी हे जाणूनबुजून केले नव्हते. मानवतेच्या दृष्टिकोनातून ते फक्त फुले घेऊन तिथे ठेवू शकतात. ते मला जाऊ देऊ शकले असते. कारण–माझा कोणताही वाईट हेतू नव्हता; पण मला वाटते की, ते अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे म्हणून मी त्याबाबत वक्तव्य करू शकत नाही.
ती असेही म्हणाली, “मल्याळी लोकांमध्ये या घटनेची मोठी चर्चा झाली आहे. त्यामुळे अधिकारी नीट कारवाई व्हावी, यासाठी सतर्क राहतील. तेथील नियम कडक आहेत.”
ऑस्ट्रेलियात फुलं, बिया, देठ किंवा कोणत्याही प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ घेऊन जाण्यासाठी कठोर नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे तेथील नागरिक आणि इतर देशातून तिथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक आहेत. ऑस्ट्रेलियाची जैवविविधता आणि शेती संरक्षण, हे त्याचे मुख्य कारण आहे. गल्फ न्यूज नुसार, ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सने काही वनस्पती, बिया आणि फुलांची यादी तयार केली आहे. ती फुले, बिया किंवा वनस्पती परवानगीशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून अभिनेत्रीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नव्या नायरच्या कामाच्या बाबतीत बोलायचे, तर ती जानकी जाने , ओरुथी व नंदनम यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते.