सध्या करोनामुळे देशाची पूर्ण घडी विस्कटली आहे. देशातील जनता करोनाच्या दहशतीखाली वावरत आहे. या काळात देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने लॉकडाउन घोषित केला आहे. मात्र तरीदेखील करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून नवाजुद्दीनला नेमकं काय झालंय असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिकडेच त्याच्या गावी गेला आहे. त्यामुळे त्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ईद साजरी करण्यासाठी नवाजुद्दीन त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईहून मुजफ्फरनगर येथे गेला आहे.

११ मे रोजी  नवाजुद्दीनत्याच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत मुजफ्फरनगर येथील बुधाना या गावी पोहोचला आहे. गावी जाण्यासाठी त्याने महाराष्ट्र राज्य सरकारची तशी कायदेशीर परवानगीही मिळविली होती. मात्र नवाज मुंबईतून प्रवास करुन आल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना १४ दिवसांसाठी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे २५ मे पर्यंत नवाज कोणालाही भेटू शकणार नाही.

दरम्यान, नवाजुद्दीन गावी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असून सगळ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.