बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या हटके आणि दमदार अभिनयासोबतच अनेकदा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आल्या आहेत. नीना गुप्ता यांच्या आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ‘सच कहूं तो’ या त्यांच्या आत्मचरित्र्यात त्यांनी आयुष्यातील काही खळबळजनक गोष्टींचा उलगडा केला आहे. यात नीना गुप्तां यांनी लहान असताना त्यांना विनयभंगाचा सामना करावा लागला होता असा खुलासा केलाय.

नीना गुप्ता शाळेत असताना त्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. नीना गुप्ता भावासोबत डॉक्टरांकडे गेल्या होत्या. यावेळी त्यांचा भाऊ बाहेर थांबला होता तर त्या डॉक्टरांच्या केबीनमध्ये एकट्या गेल्या होत्या. “डॉक्टरने माझे डोळे तपासण्यास सुरुवात केली आणि नंतर अचानक त्याने इतर ठिकाणी स्पर्श करण्यास सुरुवात केली. ज्याचा माझ्या डोळ्यांशी काहीही संबध नव्हता. यावेळी मी खूप घाबरले होते. मला स्वत:चा तिरस्कार वाटू लागला. घरात कुणी नसायचं तेव्हा मी गुपचूप एका कोपऱ्यात रडत बसायचे. आईला देखील हे सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मला वाटायचं ती बोलेल की माझीच चूक आहे. मीच त्याच्यासोबत काही तरी केलं असेल.” असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यासोबत असं अनेकदा केलं असल्याचा खुलासा त्यांनी केलाय.

‘द बॅटमॅन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; रॉबर्ट पॅटिनसनच्या अ‍ॅक्शनसाठी व्हा सज्ज

तसचं लहान असताना एक टेलरचा देखील वाईट अनुभव आल्याचं त्या या पुस्तकात म्हणाल्या आहेत. टेलरने विनयभंग करूनही त्याच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता असं त्या म्हणाल्या. “जर मी आईला त्या टेलरकडे जायचं नाही सांगितलं. तर ती का जायचं नाही याचं कारण विचारेल. या भितीने मी त्या टेलरकडे जात राहिले” असं नीना गुप्ता यांनी त्यांच्या ‘सच कहूं तो’ या पुस्तकात म्हंटलं आहे.

अलिकडे मुलांना लहान असतानाच चांगला आणि वाईट स्पर्श यातला फरक समजावला जातो. मात्र तरुण असतानाही या गोष्टी सांगितल्या गेल्या नव्हत्या असं नीना गुप्ता म्हणाल्या.