मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या आशयाच्या चित्रपटांची निर्मिती होत असते. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेकवेळा महिलांचं भावविश्व मांडलं जातं. त्यांच्या व्यथा, त्यांच्यातील सहनशीलता किंवा त्यांच्यातील निडरता. हे आणि असे अनेक वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न चित्रपटसृष्टीमध्ये करण्यात येत असतो. असाच प्रयत्न ८वर्षापूर्वी आलेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाने केला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक रसिकप्रेक्षकांचं मन जिंकलं होतं.त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

‘अगडबम’ चित्रपटातील लोकप्रिय ठरलेली नाजुका अर्थात अभिनेत्री तृप्ती भोईर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार असून ती लवकरच ‘माझा अगडबम’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये ती दमदार भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तृप्तीने या चित्रपटामध्ये केवळ एक कलाकाराची भूमिका पार न पाडता ती लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्माती या जबाबदाऱ्याही पार पाडणार आहे.