बॉलीवूडमध्ये चित्रपटाच्या प्रसिद्धिसाठी कोणत्या नव्या योजना केल्या जातील हे काही सांगता येत नाही. एरव्ही करोडो रुपयांचे मानधन घेतानाच वितरणाच्या हक्कांमध्येही वाटा ठेवणाऱ्या कलाकारांच्या अनेक सूरस कथा नेहमी कानावर पडतात. पण, आता हेच बघा ना, चित्रपटासाठी केवळ रु.११ मानधन घेण्याची नवी पद्धत बॉलीवूडमध्ये आली आहे. सोनम कपूरने ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटासाठी रु.११ मानधन घेतल्यानंतर या पंक्तीत पुढचे नाव करण जोहरचे असणार आहे. अनुराग कश्यपच्या आगामी ‘बॉ़म्बे वेल्वेट’ चित्रपटासाठी करणने रु.११ मानधन घेतले आहे. चित्रपटांसाठी घेतली जाणारी रक्कम ही मानधन नसून आता उत्सव काळातील वर्गणी झाली आहे. सोनम कपूरची ‘भाग मिल्खा भाग’मध्ये छोटी भूमिका होती. मात्र करण साकारत असलेली खलनायकची भूमिका ही लांबलचक आहे. पुढे इतर कलाकारही हा ट्रेण्ड असाच चालू ठेवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
करण जोहरने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘लक बाय चान्स’ या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.